पुरप्रभावित गावांमध्‍ये आरोग्‍य तपासणी शिबीरे आयोजित करण्‍याच्‍या आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या सूचना

0
10

पुरप्रभावित गावांमध्‍ये आरोग्‍य तपासणी शिबीरे आयोजित करण्‍याच्‍या आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या सूचना
जुनगांवकडे जाणारा पुल उंच करण्‍यासाठी केंद्रीय मार्ग निधीतुन निधी मंजूर करणार

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुल व पोंभुर्णा तालुक्‍यातील पुरप्रभावित गावांचा केला पाहणी दौरा

चंद्रपूर :- पोंभुर्णा तालुक्‍यातील जुनगांवकडे जाणारा पुल उंच करण्‍याच्‍या दृष्‍टीने लवकरच केंद्रीय भुपृष्‍ठ परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेवून केंद्रीय मार्ग निधीतुन यासाठी निधी उपलब्‍ध होईल यादृष्‍टीने प्रयत्‍न करणार अशी ग्‍वाही माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ज्‍या गावांमध्‍ये पुराचे पाणी शिरले त्‍या गावांमध्‍ये रोगराई पसरू नये यादृष्‍टीने त्‍वरीत आरोग्‍य शिबीरे आयोजित करण्‍यात यावी व जुनगांव येथे जनावरांसाठी तपासणी शिबीर आयोजित करण्‍यात यावे असे निर्देश त्‍यांनी संबंधित अधिका-यांना दिले.

दिनांक 4 सप्‍टेंबर रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा तालुक्‍यातील घाटकुळ, ठाणेवासना, देवाडा बुज, पिपरी देशपांडे तसेच मुल तालुक्‍यातील बेंबाळ, कोरंबी, नवेगांव भुजला या पुरग्रस्‍त गावांमध्‍ये पाहणी दौरा केला. यावेळी त्‍यांनी शेतशिवाराची पाहणी केली. शेतक-यांच्‍या व्‍यथा, समस्‍या जाणून घेतल्‍या. काही गावांचे पुनर्वसन करण्‍याची आवश्‍यकता असून विशेषतः पोंभुर्णा या तालुक्‍यातील टोक या गावाचे पुनर्वसन करण्‍याबाबत प्राधान्‍याने कार्यवाही करण्‍यात येईल, असेही आ. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले.

या पाहणी दौ-यात जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, पोंभुर्णा तालुका भाजपाचे अध्‍यक्ष गजानन गोरंटीवार, पोंभुर्णा पंचायत समिती सभापती अलका आत्राम, उपसभापती ज्‍योती बुरांडे, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहूल संतोषवार, मुल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, उपसभापती घनश्‍याम जुमनाके, आनंदराव ठिकरे,विनोद देशमुख , गंगाधर मडावी , अजित मंगळगिरीवार , दिलीप मॅकलवार , आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here