जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेला कार्यक्षम लोकप्रतिनिधी हरपला : आ. सुधीर मुनगंटीवार

0
98

मुल पंचायत समितीचे सदस्य संजय पाटील मारकवार यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेला कार्यक्षम लोकप्रतिनिधी हरपला अशा शब्दात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक , पंचायत समितीचे सदस्य या पदांच्या माध्यमातून
संजय पाटील मारकवार यांनी गेली अनेक वर्षे जनतेची सेवा केली. सहृदय मित्र , कार्यतत्पर लोकप्रतिनिधी म्हणून ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय क्षेत्राची हानी झाली असल्याची भावना आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असून त्यातून सावरण्याचे बळ परमेश्वर त्यांना देवो असेही आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

संजय पाटील मारकवार यांचे अपघाती निधन !

मूल : खेडी- गोंडपिपरी मार्गावरील भोवा गावानजीक रविवारी सायंकाळी ६ वाजताच्यासुमारास झालेल्या अपघातात मूल पंचायत समिती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, विद्यमान संचालक तसेच संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष, काँग्रेसचे नेते संजय मधुकर मारकवार (५२) यांचा मृत्यू झाला.
संजय मारकवार हे दुचाकीने खेडीवरून भोवामार्गे स्वगाव राजगडकडे जात असताना भोवर्लाजवळ रस्त्यावरील खड्डयात दुचाकी गेल्याने ते दुचाकीवरून उसळून पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. लगेच त्यांना सावली येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना प्रथम मूल आणि त्यानंतर चंद्रपूरला हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा बराचमोठा आप्तपरिवार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे एक धडाडीचे नेते म्हणून यांची ओळख होती. मूल येथील माँ दुर्गा मंदिर प्रतिष्ठाण तसेच विविध सामाजिक संस्थांशी ते जुळले होते. जनतेच्या प्रश्नांना घेऊन विविध आंदोलने त्यांनी केली. काँग्रेसच्या पक्ष बांधणीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी दुपारनंतर त्यांचे गाव राजगड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here