राजुरा येथे डेडिकेटेड हेल्थ कोवीड सेंटर सुरु करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना !

0
6
राजुरा, गडचांदूर येथील आरोग्य यंत्रणेचा घेतला आढावा
कोरपना, राजुरा, जिवती, गडचांदूर या भागात चाचणी वाढवण्याचे निर्देश

चंद्रपूर, दि. 22 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात संपर्कातून बाधिताची संख्या वाढत आहे. त्यामुळे शारीरिक अंतर, मास्क वापरणे, गरज नसतांना घरातून बाहेर न पडणे पुढचा काही काळ आवश्यक आहे. लॉकडाऊनला ज्यापद्धतीने स्वयंस्फूर्त प्रतिसाद नागरिक देत आहे. त्याच पद्धतीने शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन केल्यास कोरोना सोबत लढणे शक्य होईल, असा संदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दिला आहे.

जिल्ह्यातील राजुरा  व गडचांदूर भागात आज अधिक बाधित पुढे आल्यामुळे या ठिकाणी त्यांनी भेट दिली. याशिवाय राजुरा येथील आरोग्य यंत्रणेचा देखील आढावा घेतला. यावेळी राजुरा येथे डेडिकेटेड हेल्थ कोविड केअर स्थापन करून जिवती, कोरपना व गडचांदूर येथील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी या ठिकाणच्या उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी केली व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रत्येक गाव, प्रत्येक शहर आता या आजारातून बाहेर काढणे आवश्यक असून त्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळेल, असेही प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यानंतर त्यांनी गडचांदूर येथे भेट दिली. गडचांदूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती असून बाहेरून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी कोरोना पासून दूर राहणाऱ्या मूलभूत गोष्टी पाळाव्यात यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले.

चंद्रपूरकरांचे आभार :

दरम्यान, आज जिल्हावासीयांना संबोधित करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या व्हिडीओ संदेशात त्यांनी या लॉकडाऊनने आपल्याला काय दिले. हे येणाऱ्या काळात कळेल. मात्र ज्या पद्धतीने नागरिकांनी घरात राहून प्रतिसाद दिला आहे. ते बघता या मागचा उद्देश सफल होत असल्याचे दिसून येते. 26 पर्यंत हा संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद मिळालेला असून शहरातील बाधितांची संख्या कमी झालेली आहे. लॉकडाऊनचे संपूर्णपणे यश नागरिकांवर अवलंबून आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांची जबाबदारी वाढणार आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे, गर्दी करू नये, मास्क योग्य पद्धतीने वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या महत्वपूर्ण गोष्टीचे पालन करणे गरजेचे आहे.

बाहेरून जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर आरोग्य तपासणी, नोंदणी करून संस्थात्मक अलगीकरणात राहणे गरजेचे आहे. तसेच गृह अलगीकरणाचे देखील पालन करावे. संस्थात्मक अलगीकरण, कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध आहे.

21 जुलैपर्यंत 1 हजार 182 इतक्या अँन्टीजेन चाचण्या केलेल्या आहेत. या अँन्टीजेन चाचण्यांमधून 5 कोरोना बाधित पुढे आलेले आहेत. तसेच या मधील 25 स्वॅब प्रयोगशाळेमध्ये पुढील तपासणीसाठी पाठविले आहे. अँन्टीजेन चाचण्यांमुळे कोरोना तपासणीचे प्रमाण वाढले आहे. एकट्या चंद्रपूर शहरामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये 800 पेक्षा अधिक अँन्टीजेन तपासणी झालेल्या आहेत.

जिल्ह्यामध्ये 21 जुलै रोजी 10 हजार अँन्टीजेन चाचण्यांचे किट दाखल झालेले आहेत. यापैकी 4 हजार किट महानगरपालिकेला देण्यात आले आहेत. लॉकडाऊन नंतरही अँन्टीजेन चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मोठे उद्योग, कारखाने या ठिकाणी जाऊन अँन्टीजेन चाचणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील उद्योग, कारखाने, संस्थेतील नागरिकांची अँन्टीजेन तपासणी करायची असल्यास जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाला कळविणे गरजेचे आहे.

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आरटीपीसीआरच्या माध्यमातून प्रयोगशाळेत 13 हजार 372 स्वॅब तपासण्यात आलेले आहे. बाधितांच्या संख्येमध्ये घट करायची असेल तर लॉकडाऊनच्या काळामध्ये जी काळजी घेतली आहे, तीच काळजी पुढील काळात घेणे गरजेचे आहे. दाखल झालेल्या बाधितांपैकी 60 टक्केच्या वर जिल्ह्याचा  रिकवरी दर आहे. जिल्ह्यात एकाही बाधितांचा मृत्यू झालेला नाही.

नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास अडचण असल्यास त्यांनी तात्काळ आरोग्य यंत्रणेला संपर्क करून कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे. जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रत्येकाने स्वतःची, कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.

लॉकडाऊनच्या काळामध्ये कंपनी, कारखाने, उद्योग सुरु आहे. परंतु, या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार परराज्यातून, परजिल्ह्यातून जिल्ह्यात परत येत आहे. त्यामुळे कंपनी, कारखाने, उद्योगांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.

बाहेरून येणारे अधिकारी-कर्मचारी, कामगारांना 14 दिवस अथवा 10 दिवसा अगोदर आणणे आवश्यक आहे. आल्यानंतर शासकीय अथवा खाजगी स्वतंत्र अलगीकरणाची व्यवस्था केलेली आहे. त्याच ठिकाणी ठेवणे बंधनकारक राहील. जर अलगीकरण विषयक सूचनांचे पालन न करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, कामगारांना तसेच संबंधित कंपनी, उद्योग, कारखाने यांच्या मालकांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

अधिकारी कर्मचारी, कामगारांना अलगीकरण ठेवल्यानंतर त्यांची स्वॅब तपासणी करण्यात येईल. कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर तसेच संस्थात्मक अलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच त्यांना कंपनी, कारखाने, उद्योगांमध्ये कामावर रुजू करण्यात यावे. संबंधित नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई तसेच कंपनी उद्योग कारखाने यांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

कंपनी, उद्योग, कारखान्यामध्ये कोरोना बाधित आढळला तर संपर्कातील नागरिकांना अलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. बाधितांचा संपर्क ज्या ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. हे केल्यानंतरच कंपनी कारखाने उद्योग सुरू करता येईल. अलगीकरणामध्ये ठेवण्यात आलेले कामगार हे एकत्र येणार नाही किंवा बाहेर जाणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी ही संबंधित कंपनीच्या आस्थापनांची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here