२४ जुलैला काय घडणार ?; नासाने ‘Asteroid 2020 ND’ बद्दल दिला इशारा ४८ हजार किमी प्रती तास वेगाने पृथ्वीजवळून जाणार लघुग्रह

0
54
२४ जुलैला काय घडणार ?; नासाने ‘Asteroid 2020 ND’ बद्दल दिला इशारा

◼️४८ हजार किमी प्रती तास वेगाने पृथ्वीजवळून जाणार लघुग्रह

पृथ्वीसाठी धोकादायक ठरु शकणारा एक लघुग्रह (अ‍ॅस्टेरॉईड) पृथ्वीजवळून जाणार असल्याचा इशारा अमेरिकेमधील अंतराळ संशोधन संस्था असणाऱ्या नासाने दिला आहे. २४ जुलै रोजी हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असून यासंदर्भातील माहिती नासानेच माहिती जारी केली आहे. या लघुग्रहाचे नाव ‘अ‍ॅस्टेरॉईड २०२० डीएन’ असं आगे. ‘अ‍ॅस्टेरॉईड २०२० डीएन’चा लांबी १७० मीटर इतकी असल्याचे नासाचे म्हणणे आहे. हा लघुग्रह पृथ्वीपासून ०.०३४ ऑस्ट्रॅनॉमिकल युनीट म्हणजेच ५० लाख ८६ हजार ३२८ किमी अंतरावरुन जाणार आहे. पृथ्वीजवळून जाताना या लघुग्रहाचा वेग ४८ हजार किमी प्रती तास इतका असणार आहे. पृथ्वीला धोकादायक ठरु शकणाऱ्या लघुग्रहांच्या व्याख्यानेनुसार  ‘अ‍ॅस्टेरॉईड २०२० डीएन’ संदर्भात इशारा नासाकडून देण्यात आला आहे.

“हा लघुग्रह पोटेंशियली हजार्डस अ‍ॅस्टेरॉईड प्रकारातला आहे. पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या लघुग्रहांची एक व्याख्या करण्यात आली आहे. त्यानुसार या लघुग्रहाला या श्रेणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. सामान्यपणे अवकाशातील सर्वच लघुग्रह जे ०.०५ ऑस्ट्रॅनॉमिकल युनीटपेक्षा  (अंदाजे ७ दशलक्ष किमी) कमी अंतरावरुन जातात त्यांना हाच दर्जा देण्यात येतो,” असं नासाने म्हटलं आहे. हा लघुग्रह १७० मीटर लांब असणार आहे म्हणजेच हा लंडन आय या आकाश पाळण्यापेक्षाही अधिक उंच असणार आहे.

आतापर्यंत अंतराळामध्ये पृथ्वीच्या आजूबाजूच्या भागामध्ये १४० मीटरपेक्षा अधिक मोठा व्यास असणारे आठ हजारहून अधिक लघुग्रह आढळून आले आहेत. हे सर्व लघुग्रह ७ दशलक्ष किमीपर्यंतच्या परिघामध्ये आढळून आले आहेत. नासाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व खगोलीय वस्तूंचे वर्गीकरण हे पृथ्वीच्या दृष्टीने “संभाव्य धोकादायक” ठरणाऱ्या अंतराळातील वस्तूंमध्ये करण्यात आलं आहे. म्हणूनच संभाव्य धोकादायक ठरु शकणाऱ्या लघुग्रहांमध्ये ‘अ‍ॅस्टेरॉईड २०२० डीएन’ या लघुग्रहाचाही समावेश होतो. ‘स्पेस डॉट कॉम’च्या एका वृत्तानुसार, पृथ्वीच्या जवळपास असलेल्या अंतराळामध्ये एकूण २५ हजार लहान-मोठ्या आकाराचे लघुग्रह आहेत.

🔷 २०२० डीआर टू बद्दलचा संभ्रम

याच वर्षाच्या सुरुवातील, २०२० डीआर टू हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाण्याची शक्यता व्यक्त करणारे वृत्त समोर आलं होतं. २०२० डीआर टू चा व्यास हा सुमारे १९३५ फूट (५९० मीटर) इतका होता. एवढ्या मोठ्या आकाराचा एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर त्यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. प्लॅनेटरी सोसायटीच्या अंदाजानुसार ४६० फूटांहून (१४० मीटर) अधिक आकाराची कोणतीही खगोलीय वस्तू पृथ्वीवर आदळल्यास एखाद्या मोठ्या देशाच्या आकाराऐवढ्या परिसरामध्ये विनाश घडवू शकते. जर अशी एखादी गोष्ट अंतराळामधून पृथ्वीवर आदळली तर त्यामुळे होणारी जीवितहानी ही आतापर्यंतच्या मानवी इतिहासातील सर्वात मोठी जीवितहानी ठरेल अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती. मात्र त्यानंतर नासाने अशाप्रकारे अंतराळातील वस्तू पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नसल्याचे सांगत २०२० डीआर टू हा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार नसल्याचे स्पष्ट केलं.

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार  ४६० फूटांहून (१४० मीटर) अधिक आकाराची कोणतीही खगोलीय वस्तू पृथ्वीवर आदळण्याची शक्यता खूपच कमी असते. शंभरपैकी केवळ एखाद्यावेळी अशी घटना घडू शकते असं खगोलशास्त्रज्ञ सांगतात.◼️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here