विमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे !

0
33

भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरणाचे आदेश !

नवी दिल्ली

भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरण अर्थात आयआरडीएआयने विमा काढणार्‍या कंपन्यांना नवे निर्देश दिलेत. कोरोनासंदर्भातील आरोग्य विम्यासंदर्भातील दावा दाखल करुन घेतल्यानंतर त्यावर एका तासाच्या आता योग्य ती कारवाई करुन प्रक्रिया पूर्ण करावी. असे केल्याने रुग्णांना तातडीने डिस्चार्ज मिळेल, असे आयआरडीएआयने म्हटले आहे. आयआरडीएआयने दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका आदेशानंतर हे निर्देश दिलेत. २८ एप्रिल रोजी न्यायालयाने आयआरडीएआयला आरोग्य कंपन्यांना तातडीने कोरोनासंदर्भातील क्लेमची प्रक्रिया वेगवान करण्याचे आदेश देण्याची सूचना केली आहे.
२८ एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने विमा कंपन्यांना दिलेल्या आदेशामध्ये कोरोनासंदर्भातील बिलांची प्रकरण केवळ अध्र्या ते जास्तीत जास्त तासाभरामध्ये निकाली काढावीत असे सांगितले आहे. विमा कंपन्या कोरोनासंदर्भातील अर्जांना मंजुरी देण्यासाठी सहा ते सात तास घालवू शकत नाहीत. असे केल्यास रुग्णांना रुग्णालयांमधून डिस्चार्ज मिळण्यास वेळ लागतो. त्यामुळे गरजुंना बेड्सची आवश्यकता असतानाही तो मिळत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
आयआरडीएआयने सर्व विमा कंपन्यांना कोरोनासंदर्भातील विम्यांच्या प्रकरणांमध्ये तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिलेत. सर्व पक्षकारांना कोरोना प्रकरणांची वेगाने पडताळणी करुन विम्याची रक्कम मंजूर करण्यासंदर्भातील निर्देश द्यावेत असे आयआरडीएआयने कंपन्यांना सूचित केले आहे. सर्व कागदपत्र आल्यानंतर एका तासामध्ये विम्याचे प्रकरण निकाली काढावे, असे कोरोनासंदर्भातील नव्या निर्देशांमध्ये आयआरडीएने म्हटले आहे.
विम्याची प्रकरणे अडकून राहिल्याने रुग्णालयांमधून रुग्णांना डिस्चार्ज मिळत नाही त्यामुळे गरजूंना सेवा उपलब्ध होत नाहीत आणि विम्यासाठी अर्ज करणारा रुग्णही अडकून राहतो, असे आयआरडीएआयने म्हटले आहे. विमा कंपन्यांनी आणि टीपीए बिलांची रक्कम देण्यामध्ये जास्त वेळ लागत आहे. त्यामुळेच रुग्णालय प्रशासनालाही नाइलाजास्तव रुग्णांना ८ ते १0 तास रुग्णालयातच ठेवावे लागत आहे. त्यामुळे बेड्स अडकून राहत आहेत. आयआरडीएआयच्या निर्देशानंतर विमा प्रक्रिया वेगवान होऊन रुग्णांना तातडीने डिस्चार्ज मिळणार आहे. यापूर्वी आयआरडीएआयने दोन तासांमध्ये कॅशलेस क्लेमची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here