विधानसभेचे हिवाळी अधिवेशन मुंबईत !

0
39
कोरोना च्या पार्श्वभूमीवर कामकाज सल्लागार समितीचा निर्णय !

मुंबई : वाढत्या कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नेहमीप्रमाणे नागपुरात होणारे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन यावेळी येत्या ७ डिसेंबर २0२0 पासून मुंबईत होणार आहे. हा निर्णय कामकाज सल्लागार समितीमध्ये घेण्यात आला. मुंबईत विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचे ठरले.
या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्यात येणार असून येत्या ७ डिसेंबर २0२0 ला अधिवेशन घेता येईल का आणि किती दिवस घ्यायचे याबाबतही निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. बैठकीत हिवाळी अधिवेशनासाठी लागणार्‍या सुविधांचाही आढावा घेण्यात आला. अनेक विधिमंडळ सदस्यांनी नागपूर येथे कोविडच्या पार्श्‍वभूमीवर हिवाळी अधिवेशन घेणे उचित होणार नाही अशा सूचना यावेळी केल्या.
विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे) संसदीय कार्यमंत्री डॉ.अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here