वीज बिल व परीक्षा संदर्भात शासन सकारात्मक : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

0
5

वीज बिल संदर्भातील जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून

चंद्रपूर दि, 6 जुलै : शेतकऱ्यांना दिवसा व स्वस्त दरात वीज मिळावी तसेच सर्वसामान्य ग्राहकाला व घटकातील शेवटच्या माणसाला वीज मिळेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे नगर विकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. ते चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जिल्ह्यातील विज बिलासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या याविषयी सार्वजनिक बांधकाम विश्रामगृह येथे बैठक पार पडली.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे  प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकीमध्ये स्थानिक मुलांच्या रोजगाराचा प्रश्न, दुर्गम भागातील आदिवासी मुलांच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संदर्भातील प्रश्न व जिल्ह्यातील इतर समस्या बाबत निवेदने सादर करण्यात आली.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात सर्वत्र रोजगार बंद पडले असून सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम नाही. त्यातच अमाप वीजबिलाची भर पडली आहे. नागरिकांच्या या समस्या जाणून घेऊन लाकडाऊनच्या काळातील 3 महिन्याचे विज बिल टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा द्यावी, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्या. त्यासोबतच लॉकडाउनच्या काळात मिटर रिडींग घेणे शक्य नव्हते. त्यामुळे नागरिकांना सरासरी वीज बिल पाठविण्यात आले. रीडिंग झाले नसल्यास प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर  विज बिल कमी करण्यात येईल. महावितरणने सरासरी वीज बिल पाठवले असून सुद्धा नागरिकांकडून सक्तीने वसुली केलेली नाही. कोणत्याही ग्राहकाकडून सक्तीने वसुली केली जाणार नाही असेही त्यांनी या वेळी उपस्थित नागरिकांना सांगितले.

महावितरणने नागरीकांना वीज बिलाची संपूर्ण माहिती देऊन वीज विषयक समस्या व शंकांचे संपूर्ण समाधान करावे. तसेच ग्राहकांनी वीज बिल तपासून घ्यावे आणि शंका असल्यास नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून समस्येचे निवारण करावे असे आवाहन यावेळी केले.

त्यासोबतच कोरोना लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करावा. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात  आल्या आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष कैलासवासी महेंद्र लोखंडे यांच्या निवासस्थानी सांत्वना भेट दिली. दुपारी त्यांनी कैलासवासी राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मारकाला देखील भेट दिली. त्यानंतर महानगरपालिकेत जाऊन आढावा घेतला. महानगरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here