डिजिटल मीडियाच्या जादुई नगरीत ‘गोंडवाना दर्पण’ चे पदार्पण !

0
43
डिजिटल मीडियाच्या जादुई नगरीत ‘गोंडवाना दर्पण’ चे पदार्पण !

आजच्या आधुनिक युगात एका क्लिकवर सारेजग समाविष्ट झाले आहे. देशातील मीडियासुद्धा याच क्लिकवर आज येऊन ठेपला आहे. याच डिजीटल मीडियाच्या जादुई नगरीमध्ये ‘गोंडवाना दर्पण’ आज पदार्पण करीत आहे. ‘दर्पण न्युज नेटवर्क अॅन्ड ब्रॉडकास्टिंग’ द्वारा संचालित ‘गोंडवाना दर्पण’ टिम वर्क च्या माध्यमातून कार्य करणारे जिल्ह्यातील पहिले नेटवर्क डिजीटल माध्यम आहे. असत्याची चिड व सत्याची जाण असणाऱ्या प्रत्येक शेवटच्या माणसासाठी ‘गोंडवाना दर्पण’ आपल्या समस्या-अडचणी मांडण्याचे माध्यम ठरेल, अशी अपेक्षा व स्वप्न बाळगून आपल्या मोबाईलवर हे माध्यम झळकणार आहे. कोरोना सारख्या महामारीसोबत आज जग संघर्ष करीत आहे. भारत देश लढत आहे. सर्वसामान्य माणूस यामध्ये होरपळला जात आहे. लढून जगायचे आहे. ही मानसिकता आज साऱ्यांनाच बाळगायची आहे. आलेली वेळ जाण्यासाठीचं आहे. हे सुत्र मनाशी बांधून जगण्याचा मानस बाळगायचा आहे. ‘गोंडवाना दर्पण’ विशेष उद्देश घेऊन समोर आले आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात आमचे कुणी स्पर्धक नाही आणि आम्हाला स्पर्धा ही करायची नाही आणि कुणी आमच्याशी स्पर्धा करू नये, हे ही यानिमीत्त सांगावेसे वाटते. आम्हाला फक्त सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे, शेवटच्या माणसांच्या समस्यांना उजागर करणे, त्याला शासन स्तरावर मांडणे, प्रशासनाच्या नजरेस आणून देणे आणि त्यातुन मार्ग काढणे हा सकारात्मक सार्थ हेतु घेवून ‘गोंडवाना दर्पण’ डिजीटल मिडीयाच्या जगात पदार्पण करीत आहे. यासोबतचं विविध व्यासंग जोपासणाऱ्यांना त्यांचे स्वतःचे हक्काचे व्यासपिठ मिळवून देण्याच्या उद्देशाने याठिकाणी आम्ही आपले पहिले पाऊल ठेवित आहे. जगामध्ये घडणाऱ्या घटना क्षणार्धात समाजासमोर आणण्याची अकल्पनिय शक्ती डिजीटल माध्यमांमध्ये आहे आणि ती जगाला त्यांनी दाखवून दिली आहे. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्ता असलेल्या देशात जॉर्ज फ्लाईड यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर ‘मला श्वास घेता येत नाहीये’ हे वाक्य सोशल माध्यमांवर फिरू लागलं, सोशल माध्यमांवर जॉर्ज फ्लाईड यांच्या मृत्यूनंतर पेटलेल्या चिंगारीने अमेरिकेमधील वर्णद्वेषाचा चेहरा साऱ्या जगासमोर पुन्हा एकदा समोर आला, सोशल माध्यमांची शक्ती जगाने वारंवार अनुभवली आहे. सोशल माध्यमांच्या नकारात्मक बाजूंकडे कानाडोळा करून त्याच्या सकारात्मक बाजु व गरजा लक्षात घेवून या माध्यमाकडे बघण्याची आज वेळ आली आहे. ‘गोंडवाना दर्पण’ हे सर्वसामान्यांसाठी त्यांचे हक्काचे व्यासपिठ असावे, यासाठी आमची संपूर्ण चमू प्रयत्नशिल राहील. प्रत्येकांपर्यंत पोहोचण्याच्या आमचा प्रयत्न राहणार असून प्रत्येकाने आमच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांना-अडचणींना वाचा फोडावी व सकारात्मक गोष्टींना यातून उजाळा द्यावा, अशी यानिमीत्त आम्ही अपेक्षा करतो. समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी, वार्ता, थोडेसे कटू-थोडे गोड मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील. वास्तव व सत्य लवकरात लवकर आमच्या वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही आपलेसोबत कटिबद्ध आहोत. आपल्या समस्या, साहित्य, कटू-गोड अनुभव सोबत दिलेल्या व्हॉटस्अॅप व ई-मेल च्या आपण आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात अशी आशा बाळगून ‘गोंडवाना दर्पण’ चे डिजीटल मीडियाच्या या जगात आजपासून पदार्पण होत असून आम्ही आपल्या पसंतीस अवश्य उतरू अशी अपेक्षा याठिकाणी आम्ही बाळगतो.

संचालक,
दर्पण न्युज नेटवर्क अँड ब्राडकास्टिंग, चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here