प्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी !

0
83

मिनरल वॉटर प्लांट बंद प्रकरण; दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश !

चंद्रपूर : राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार प्रशासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील मिनरल वॉटर प्लांट बंद करण्याचे आदेश दिले. दरम्यानच्या काळात या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे या कारवाईविरोधात मुंबई हायकोर्ट नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सुनावणी करत नागपूर खंडपीठाने प्रधान सचिवांसह चंद्रपूर मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी करून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात व इतर ठिकाणी कॅन व जारमध्ये पिण्याचे पाणी विकणार्‍या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश मनपा व नगरपरिषद हद्दीत पालिका प्रशासनाने दिले होते. एवढेच नव्हे तर दरम्यानच्या काळात कारवाई करण्यात आल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. व्यवसाय बंद झाल्याने पाणीवाटप करणार्‍या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला.

दरम्यान, राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने मिनरल वॉटर विकणार्‍या व्यवसायावर प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार सेंटर ग्राऊंड वॉटर ऑथिरिटीनेसुध्दा दिशानिर्देश जारी केले आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी विकणार्‍या व्यावसायिकांवर योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. पण, पाणी विकणार्‍या व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची योग्य व रितसर परवानगी घेऊनच व्यवसाय सुरू केला, तसेच खुले पाणी विक्री करण्यास निर्बध नाही. यानंतरही स्थानिक स्वराज्यसंस्थांनी त्यांचे व्यवसाय बेकायदेशीर असल्याचे आदेश बजावले. चंद्रपूर महानगर पालिकेने संबंधित व्यवसायिकांना पाठविलेल्या नोटिसा या बेकायदेशीर असल्यामुळे त्यांनी अँड.शिल्पा गिरटकर यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here