पेरीव धान पेरणी पध्दतीमुळे शेतीवरील खर्च कमी करता येतो : डॉ. उषा डोंगरवार

0
47

सामदा येथे कृषी दिन; शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी शास्त्रज्ञ थेट बांधावर

चंद्रपूर, दि. 11 जुलै: धान शेतीवर हवामान बदलाचा फार मोठा परिणाम दिसुन येतो. चिखलणी योग्य पाऊस उपलब्ध न झाल्यामुळे धान रोपांचे पऱ्हे अवस्था मध्येच वय वाढते व 30 दिवसापेक्षा जास्त वयांची धानाची रोपे लागवड केल्यामुळे उत्पादन कमी मिळते. अशावेळी पेरीव धान एक उत्तम पर्याय आहे. पेरीव धान पेरणीमुळे चिखलणी व रोवणी करणे, रोपे खोदणे, पेंढ्या पसरविणे, नर्सरी पोसणे इ. कामावरील खर्च कमी करता येतो. शेतकऱ्यांना रब्बी हंगामामधील पिके पेरणीकरीता जमिन लवकर उपलब्ध होते. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन सहयोगी प्राध्यापक,कृषिविद्या कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही डॉ. उषा डोंगरवार यांनी केले आहे. यावेळी त्यांनी धानाचे तण व खत व्यवस्थापन तसेच जिवाणू खताचे महत्व व शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर सखोल असे मार्गदर्शन केले.

किटकशास्त्रज्ञ डॉ. प्रविण राठोड यांनी एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन संदर्भात प्रत्यक्ष बांधावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे भात पैदासकार डॉ. मदन वांढरे यांनी धानाच्या विविध जाती व योग्य बियाणे कसे निवडावे या विषयी मार्गदर्शन केले. कृषिशक्ती व अवजारे याविषयीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. पारिष नलवडे यांनी कृषि यांत्रीकीकरण, धान लागवडीमध्ये वेगवेगळया अवजारांच्या वापरा विषयी माहिती दिली.

सुधारीत पेरीव पध्दतीत जमिन टॅक्टरने अथवा साध्या नांगराने आडवी-उभी नांगरनी करून उपलब्ध सेंद्रीयखते, शेणखत जमिनीत मिसळुन शेत पेरणीस तयार करून ठेवावे. पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने (ट्रॅक्टर आरोहित बियाणे पेरण्याचे यंत्र) किंवा तिफनीने बी ओळीत पेरावे. दोन ओळीतील अंतर 20 सेमी ठेवून साधारणपणे 10 ते 15 सेमी वर दोन किंवा तिन दाणे पडतील या प्रमाणे पेरणी करावी. या करीता बारीक जातीचे 50 किलो व जाड जातीचे 75कि. बियाणे हेक्टरी लागेल.

पेरणी बरोबरच रासायनिक खताचा पहिला हप्ता (62.5 किलो नत्र, 62.5 किलो स्फुरद व 62.5 कि. पालाश) दयावा. खते पेरपीबरोबरच दिल्यामुळे पिकास पूर्णपणे उपलब्ध होऊ शकतात. पेरणी झाल्यानंतर ओलीत केल्यास उगवणपूर्व तणनाशक जसे पेडीमेथॉलिन वापरुन आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार एखादे निंदण अथवा उगवणीनंतर तणनाशके वापरूण तणाचा बंदोबस्त करता येतो. रासायनिक खताचा दुसरा व तिसरा हप्ता (31.25 कि. नत्र/हे.) देता येतो.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाहीच्या वतीने सामदा येथे हरीत कांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमीत्य कृषी संजीवनी सप्ताह तसेच कृषीदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन गोकुळ बह्याल, हिवराज पोहणकर यांच्या शेताच्या बांधावर करण्यात आला. या प्रसंगी उपसरपंच दादाजी बह्याल, पोलीस पाटील रमेश पोहणकर, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ.उषा डोंगरवार तसेच गावातील शेतकरी  प्रामुख्याने उपस्थित होते.◼️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here