केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त गावांची पाहणी

0
23

केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त गावांची पाहणी

चंद्रपूर, दि, 11 सप्टेंबर:- गोसिखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि सावली तालुक्यातील 70 गावांचे मोठे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी आज आंतर केंद्रीय मंत्रालयीन पथक दाखल झाले. त्यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी आणि किन्ही गावातील पडलेली घरे आणि शेतीची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला.

गोसिखुर्द धरणाचे 33 द्वार 5 मीटरने उघडल्याने 30237 क्युमेंक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आला. सलग तीन दिवस हा विसर्ग सुरू राहिल्याने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला याचा मोठा फटका बसला. हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने शेतातील पिके सडली. गावात पाणी शिरल्यामुळे अनेक गावातील 5917 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. रस्त्यावर 10 ते 11फूट पाणी होते. या पुरामुळे ब्रम्हपुरी , आणि सावली तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथक नागपूर विभागातील 4 जिल्ह्यांची पाहणी करण्यासाठी आले.

या पथक प्रमुख राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन चे सहसचिव जी. रमेशकुमार गांता, कृषी मंत्रालयाचे संचालक आर पी सिंग, रस्ते व परिवहन विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार व्यास यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विजय पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ उदय पाटील उपस्थित होते.

ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगल वाडी येथील शेतकरी अतुल देवराम मेश्राम यांच्या शेताची पथकाने पाहणी केली. त्यांच्या 0.38 हेक्टर शेतात कापूस पीक होते. शेतात 8 ते 10 फूट पुराचे पाणी शिरल्याने संपूर्ण कपाशी जळाली. अजूनही शेतातील काही भागात पाणी साचल्याचे दिसत होते. तसेच धानाच्या शेतीत धान सडले होते. या गावातील 100 टक्के शेतकऱ्यांच्या शेतीचे संपूर्ण पीक सडल्याचे यावेळी सरपंचाने सांगितले. पुढे रब्बी पीकही या शेतीत घेता येणार नाही असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

पुढे किन्ही गावातील पडलेल्या घरांची त्यांनी पाहणी केली. गावातील 25 घरे पूर्णतः पडलेली आहेत. तर 75 घरे अंशत: पडली आहेत. गावातील नागरिकांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. एका महिलेचे घर पूर्णत: पडले आहे त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला. गावात 10 ते 15 फूट पाणी भरले होते. ट्रॅक्टरने गावातील लोकांना बाहेर काढण्यात आले. केवळ अंगावरच्या कपड्याने लोक बाहेर पडलेत. घरातील धान्य, कपडे, सामान सर्व पुराच्या पाण्याने खराब झाल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली.

उद्या गडचिरोलीहून परत येताना काही गावांमधील नुकसानीची पाहणी करू, त्याचे नियोजन करण्यासंदर्भात श्री. गांता यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी दोन्ही तालुक्यातील नुकसानीची माहिती दिली.◼️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here