जन आरोग्य योजनेतील प्रलंबित दावे तात्काळ निकाली काढावे : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

0
6

जन आरोग्य योजनेतील प्रलंबित दावे तात्काळ निकाली काढावे : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

जन आरोग्य योजनेतंर्गत जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीची आढावा बैठक

चंद्रपूर दि.9 सप्टेंबर: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील अंगीकृत रुग्णालयाचे प्रलंबित दावे योग्य तपासणीअंती तात्काळ निकाली काढण्यात यावे. कोरोना बाधितांना अंगीकृत रुग्णालयात मोफत लाभ देण्यात यावा असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी संबंधित अधिकारी यांना दिलेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात योजनेची जिल्हा नियंत्रण तथा तक्रार निवारण समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय राईंचवार, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्यरुग्ण डॉ. हेमचंद्र कन्नाके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रतिनिधी डॉ. हर्षित नगरकर, बुक्कावर हॉस्पिटलचे डॉ. पियुष मुत्यलवार, मुसळे हॉस्पिटलचे डॉ. भाविक मुसळे उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता राज्यातील रहिवाशी असणाऱ्या सर्व नागरिकांना या योजनेच्या लाभाकरिता 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत पात्र ठरविण्यात आले आहे. तसेच कोरोना विषाणू आजाराकरिता या योजनेअंतर्गत 20 पॅकेजेसचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यासोबतच लॉकडाऊन काळात नाॅन कोविड रुग्णांना आतापर्यंत पुरवण्यात आलेल्या लाभाची माहिती, व नव्याने घेण्यात आलेल्या रुग्णालयांची माहिती आरोग्य यंत्रणेने यावेळी दिली.

तत्पुर्वी, बँकांसमोर होणारी गर्दी टाळण्यासाठी बँक व्यवस्थापकसह आढावा बैठक जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी घेतली. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यावर आळा घालण्यासाठी बँक परिसरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवावे, बँकेत सॅनीटायजर, रांगेत उभे असताना दोन व्यक्ती मधील अंतर कमीत कमी 1 मीटर ठेवावे. मास्क घातल्याशिवाय आत मध्ये प्रवेश देऊ नये अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बँक व्यवस्थापकांना दिल्यात.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, शहरातील विविध खासगी व सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांसमोर खात्यातून पैसे काढण्यासाठी अथवा रोजच्या व्यवहारासाठी ग्राहकांचा ओघ अद्यापही सुरू आहे. त्यामुळे शहरातील विविध बँकांसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवावे. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सर्व बँकांचे व्यवस्थापक, संबंधित विभागाचे अधिकारी तथा कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here