कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

0
5
कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.6 ऑक्टोबर: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांना योग्य माहिती पुरविण्याच्या अनुषंगाने हेल्पलाईन क्रमांक जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यान्वित करण्यात आले आहे. नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करीत आपल्या समस्येची सोडवणूक करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

सदर हेल्पलाइन क्रमांक 24 तास कार्यान्वित असून त्यामध्ये 07172-274161, 07172-274162 व 07172-274163 या हेल्पलाईन क्रमांकांचा समावेश आहे.

कोरोना काळात लोकांच्या मनात भितीचे वातावरण आहे. काही व्यक्तींना निराशा तसेच मानसिक अस्वास्थ्य निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनातील समज-गैरसमज दूर करून शंकांचे निवारण करणे, हा या हेल्पलाईनचा उद्देश आहे.

या लॉकडाऊनच्या काळात अनेकांना काही वैद्यकीय तसेच मानसिक मदतीची ही गरज असते. तसेच काही तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून हवी असते. या माध्यमातून प्रशासन व लोकांमधील दुवा बनण्याचे काम ही हेल्पलाईन करणार आहे.

या हेल्पलाईनच्या माध्यमातून आलेल्या फोन कॉलद्वारे नागरिकांना जिल्ह्यातील खासगी तसेच शासकीय रुग्णालयातील बेडची उपलब्ध संख्या, त्यांची माहिती जाणून घेता येणार आहे. त्यासोबतच होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांना माहिती व मार्गदर्शन तसेच कोरोना विषाणूची भीती, सद्यस्थितीतील व भविष्यातील अनिश्चितता, लॉकडाऊन परिस्थिती, वेगाने होणाऱ्या घडामोडी इत्यादी गोष्टींचा परिणाम सर्वांच्यात मानसिक स्वास्थ्यावर पडत आहे. या कठीण प्रसंगाला तोंड कशा प्रकारे द्यावे, आपले तसेच कुटुंबीयांचे मानसिक स्वास्थ्य कशाप्रकारे सांभाळावे, त्यावर उपचार पद्धती व समुपदेशन या हेल्पलाईनद्वारे केले जाते.

रुग्णांना अतिदक्षता काळात रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाते. त्यासोबतच पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींचे नमुने घेण्यासाठी मदत व माहिती वेळोवेळी पुरविल्या जाते. तसेच जे रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहे अशा रुग्णांना दैनंदिन 17 दिवसापर्यंत भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारणा व आरोग्यासंबंधी योग्य मार्गदर्शन केले जाते. तसेच रुग्णाच्या प्रकृतीमध्ये काही बिघाड झाल्यास त्याची माहिती जबाबदार अधिकाऱ्यास त्वरित कळविल्या जाते.

आरोग्य सेतू ॲपच्या माध्यमातून जे रुग्ण संशयित आढळतात त्यांना संपर्क साधून योग्य माहिती व मार्गदर्शन केले जाते. त्यासोबतच जे रुग्ण उपचाराअंती बरे झालेले आहेत अशा रुग्णांना संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात करण्यात येत असून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी योग्य ते मार्गदर्शन माहिती पुरविल्या जाते.

येणाऱ्या प्रत्येक कॉलचा पाठपुरावा, कोरोना कॉल सेंटर, कोरोना नियंत्रण कक्षामार्फत केला जातो. ही यंत्रणा 24 तास नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित असून या यंत्रणेमध्ये आरोग्य विभागाचे 29 तर खाजगी शाळेचे 15 शिक्षक असे एकूण 44 कर्मचारी कर्तव्य बजावत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here