ताप, खोकला या आजाराची जिल्ह्यात साथ ! उपचारासाठी नागरिक मात्र धास्तावलेले !

0
31
ताप, खोकला या आजाराची जिल्ह्यात साथ !
उपचारासाठी नागरिक मात्र धास्तावलेले !

चंद्रपूर : वातावरणातील बदलाने अनेकांना सर्दी, खोकला, अंगदुखीसह तापाची लक्षणे जाणवत आहे. कोरोनाच्या धास्तीने सर्दी, खोकला झाला तरी अंगावर काटा उभा राहतो. डॉक्टरकडे जायला अनेकांना भीती वाटते. अनेक जण अशा स्थितीत घरगुती उपाय करून इलाज करीत आहे. रुग्णालयात गेले तर कोरोना तपासणीची धास्ती आणि नाही गेले तर प्रकृती खालावते की काय, याची चिंता यामुळे अनेकजण घरगुती उपाययोजनांकडे वळले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना बाधितांचा आकडा आठ हजारावर पोहतच आहे तर मृत्यूचा आकडा ही दररोज वाढत आहे. अशातच वातावरणातील बदलाने विषाणूजन्य आजारांची लागण झाली आहे. दरवर्षी या महिन्यात सर्दी, ताप, खोकला होतच होता. त्यावर रुग्णालयात जावून उपचारही केला जात होता. परंतु यावर्षी स्थिती वेगळी आहे. साध्या शिंका यायला सुरुवात झाली तर मनात शंका घर करतात. सर्दी आणि खोकला झाला तर भीतीत भर पडते आणि ताप आला तर कुठेतरी आपण कोणाच्या संपर्कात तर आलो नाही ना, याचा विचार सुरु होतो. याच कारणाने अनेक जण अंगदुखी ताप, सर्दी, खोकला झाला तरी अंगावरच काढत आहे. एकीकडे सोशल मिडियापासून कोरोनावर नीट उपचार
होत नसल्याची ओरड आहे. अनेक खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे काही दवाखाने बंद आहे. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
प्रशासनाने मास्क वापरणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे सक्तीचे केले आहे. प्रशासनाने दंडाची तरतूद केली आहे. त्यानंतरही अनेक जण मास्कशिवाय फिरताना दिसून येत आहे. दरम्यान, आता जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. प्रशासन गांभीर्याने कोरोना निर्मूलनासाठी प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र अजूनही दुर्लक्ष करीत आहे. तर काही जण स्वत:ची सुरक्षा स्वत: करीत आहेत.
डॉक्टरांकडे जाण्यास टाळाटाळ विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जाण्याची गरज असते. परंतु शासकीय रुग्णालयात कोरोनामुळे जाण्यासाठी अनेक जण टाळतात. तर खाजगी रुग्णालयात डॉक्टर प्रतिसाद देत नाही. असा अनेकांना अनुभव आहे. त्यामुळेच आता अनेक जण घरच्या घरीच उपचार करीत आहे. विविध वनस्पतींचा काढा, हळदीयुक्त दूध, निंबू पाणी, मिठाच्या पाण्याचे गुळल्या. अद्रकाचा चहा घेण्यावर नागरिकांचा भर आहे. घरातील एक जण आजारी पडला की दुसराही आजारी पडतो. त्यामुळे कोरोनाची धास्ती वाढत आहे. अशा स्थितीत नागरिकांनी लक्षणांना न घाबरता थेट डॉक्टरांचा सल्ला घेवून उपचार करण्याची गरज आहे.
वैद्यकीय उपचार महत्त्वाचे कोणत्याही आजाराची प्राथमिक लक्षणे दिसताच त्यावर वैद्यकीय उपचार करणे गरजेचे आहे. अलिकडे अनेक जण दुखणे अंगावर काढत आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य साथ निर्माण झाली आहे. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासोबत आजाराची लक्षणे दिसतातच तपासणी करणे महत्वाचे आहे. यासोबतच पुरेशी झोप, दैनंदिन योग प्राणायम, गरम पाणी, बाहेरचे खाणे टाळणे, फल आहार वाढविणे आणि कुटुंबात आनंदी राहणे आवश्यक असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here