नगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची !”

0
587

दारू चे “चक्कर” जिल्ह्याला करतयं “घनचक्कर” !

चंद्रपूर : शुक्रवार दि. १७ रोजी भाजपचे नगरसेवक यांच्या घराच्या वॉलकम्पाऊंडवर आर.एस. च्या दारूचा बॉक्स ठेवण्यात आला व चंद्रपूर जिल्ह्यातील तत्पर पोलिसांनी लगेच “जेम्सबॉन्ड” च्या भुमिकेत त्वरित त्याठिकाणी दाखल होवून रवि आसवानी यांना “तुम्ही दारू विकता?’ अशी धमकावणी देत त्यांचेवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. दारू विक्रेते दर्शनी भागामध्ये दारू ठेवून विक्री करीत नाहीत, याचा अनुभव बहुतेक या पाच वर्षात जिल्हा पोलिसांना आलाचं असेल. आसवानी हे दारू विक्रेते नाहीत, त्यांना फसविण्याचा प्रयत्न केला जात असून त्यांच्या बाजुने चंद्रपूरातील सिंधी समाज उभा असल्याचे बलराम डोडानी यांनी वृत्तामधुन म्हटले आहे. एखाद्या व्यक्तीच्या मागे पुर्ण समाज उभे राहण्याची ही पहिलीचं वेळ आहे. या पाच वर्षात जिल्हा पोलिसांनी अनेक दारू विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. आजच्या स्थितीमध्ये दारू विक्रेते कोण आहेत? हे नव्याने शोधण्याची पोलिसांना तरी गरज नाही. काही बेईमान पोलिसांमुळे बदनाम झालेल्या पोलिस विभागाने आता मंथन करणे गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षकांनी यावर आत्तातरी “चिंतन” करावे असे यानिमीत्ताने त्यांना सांगावेसे वाटते. २०१५ मध्ये चंद्रपूरातील दारूबंदीनंतर जिल्ह्याने राजीव जैन, संदिप दिवाण, नियती ठाकेर व आत्ताचे डॉ. महेश्वर रेड्डी असे चार पोलिस अधिक्षक या पाच वर्षामध्ये बघितले आहे. दारूबंदीनंतर तोडगा निघावा असे पाऊल उचलण्यात पोलिस विभागाला यश आले नाही. काही बेईमान अधिकाऱ्यांनी दारूबंदीनंतर जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या प्रतिमेला लागलेला “डाग” धुण्याचा कधीही प्रयत्न केला असे बघण्यात आले नाही. छत्रपती चिडे नावाच्या पोलिस अधिकाऱ्याची चिरडून दारू विक्रेत्यांनी केलेल्या हत्येनंतर बेईमान पोलिसांना काही ‘अक्कल’ येईल असे वाटत होते, परंतु तसे जिल्ह्यात काहीही झाले नाही. चिडे हत्याकांडापुर्वी पोलिसांवर दारू विक्रेत्यांकडून हल्ले झाले नाहीत काय ? त्याचा तपास, संशोधन व चिंतन-मंथन पोलिस विभागाने पुर्वी केले असते तर आज ओढावणारी भयंकर स्थिती जिल्हा पोलिसांवर कधिही ओढविली नसती. यात सगळेच पोलिस दोषी आहेत, असे आम्हाला म्हणायचे नाही. विभागातील जे दहा-बारा “अफजलखान” पोलिस विभागमध्ये आहेत, त्यांच्यावर बंधने आणायला हवी, असेच याठिकाणी सांगवेसे वाटते.
नगरसेवक रवि आसवानी यांच्या रामनगर येथील सिंधी कॉलनीतील राहत्या घरच्या वॉल कम्पाऊंडवर महागड्या दारूचा बक्सा निदर्शनास येतो आणि पोलिस विभागातील अति शहाणे अधिकारी “जेम्सबॉन्ड” च्या शैलीत त्यांच्या घरी धडकतात, एवढी तत्परता जर पोलिसांनी दारू तस्करांना पकडण्यात दाखविली तर जिल्ह्यात दारूबंदी यशस्वी करणारा राज्यातील पहिला जिल्हा म्हणून सन्मान पोलिस विभागाला मिळू शकतो. दारू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात पोलिस दिरंगाई करतात, मग एकाएकी काही अवधीमध्येच नगरसेवक आसवानी यांच्या घरी पोलिस कसे काय धडकले? त्यांच्या घरी दारू चा बक्सा ठेवला आहे याची सुचना ज्या खबऱ्याकडून त्यांना मिळाली व ज्या पोलिसांनी त्यांचे घरी जाण्यास तत्परता दाखविली त्यांची ही चौकशी होणे तेवढेच गरजेचे आहे. सुचना दिल्यानंतर ही पोलिसांना दारू विक्रेते मिळत नाही, विक्रेते मिळाले तर दारू मिळत नाही असा अनेकांचा अनुभव आहे. मग याठिकाणी पोलिसांनी दाखविलेली तत्परता ही संशोधनाचा विषय आहे.

◼️जीवन लाकडेवर हमला करणारा अमित गुप्ता अद्याप ही फरार ?


जीवन लाकडे या रामनगर पोलिस मध्ये आपले कर्तव्य बजावणा-या पोलिस अधिका-यावर हमला करणारा अमित गुप्ता नावाचा दारू तस्कर २९ मे पासून आजपावेतो फरार आहे. पाताळात गेला की स्वर्गात जागा मिळाली हे कोडे आहे. ‘सद् रक्षणाय-खलनिग्रहणाय’ हे ब्रिद असणारा पोलिस विभाग आपल्याच विभागातील एखाद्या अधिकाऱ्यावर हमला करणा-या अमित गुप्ता याचा शोध दोन महिन्याच्या अवधीमध्ये घेवू शकला नाही, तर तीच पोलिस सर्वसामान्यांना काय न्याय मिळवून देवू शकेल, हा प्रश्र्न आज सर्वसामान्यांना भेडसावत आहे.

◼️दारू विक्रेत्यांच्या मोहल्ला कमेट्या?

दारू विक्रेत्यांच्या मोहल्ला कमेट्या स्थापन झाल्या असल्याचे वृत्त मागील महिन्यामध्ये सोशल माध्यमांवर व वृत्ताच्या माध्यमातून झळकले होते. नावासहीत त्यांच्या तक्रारी ही गृहमंत्र्यांना करण्यात आल्या होत्या. त्याच मोहल्ला कमेटीचा एक सदस्य असलेला हा अमित गुप्ता आहे. आज तो फरारीमध्ये असुन ही त्याचीच माणसे आज दारू चा व्यवसाय सुरळीतपणे करीत आहे. १२ जुलै रोजी रामनगर पोलिसांनी चंद्रपूर शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या नेतृत्वात बंगाली कॅम्प येथे दारूवर कारवाई केली, त्यातील मुख्य आरोपी इलियास हा फरार आहे. तो सुद्धा या मोहल्ला कमेटीचाच एक सदस्य आहे. त्याची सुद्धा तक्रार गृह मंत्र्यापर्यंत गेली आहे.

◼️’परमिशन “Permission” ने चालणारे दारूचे व्यवसाय, शोधाचा विषय ?

जिल्ह्यातील दारू विक्रेत्यांकडून हमखास ऐकण्यात येणारा शब्द म्हणजे “परमिशन” ! परमिशन मुळे व्यवसाय सुरू आहेत, असे ते हमखास सांगतात. दारू विक्रीसाठी मिळालेली ही “परमिशन” पोलिस विभागाने कि राजकीय नेत्यांनी दिली? हा शोधाचा विषय आहे. “मुख्य आरोपी फरार” व “परमिशन” हे दारू विक्रेत्यांचे परवळीचे शब्द आहेत. दारू पकडल्यानंतर होणाऱ्या कारवाईत मुख्य आरोपी पोलिसांच्या लेखी फरार दाखविल्या जातो. हे कोडे न समजणारे आहे. तसेच दारू विक्रेते आपल्या व्यवसाय “परमिशन” घेवून कसे चालवित आहेत, हा जिल्ह्यामध्ये शोधाचा विषय आहे. या दोन ही शब्दांचा तपास पोलिसांच्या वरिष्ठ अधिका-यांनी अवश्य करायला हवा.

◼️आरोपी फरार; मग गोपनिय का?


१२ जुलै रोजी रामनगर पोलिसांनी बंगाली कॅम्प परिसरात दारूवर कारवाई केल्यानंतर इलियास सोबत काही आरोपी घटनास्थळावरून फरार झालेत, दारूच्या कारवाईनंतर आरोपीचं फरार कसे होतात? हा जसा संशोधनाचा विषय आहे. तसेच आत्तापावेतो दारू च्या प्रकरणात जिल्ह्यामध्ये किती आरोपी फरार आहेत, त्यांची नांवे पोलिसांनी प्रसारमाध्यमांसमोर जाहिर कां केली नाहीत? १२ जुलैच्या घटनेनंतर रविवार दि. १२ व सोमवार दि. १३ जुलै रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांनी दारू विक्रेत्यांना धडकी भरविणाऱ्या मोठ्या कारवाया केल्यात. या कारवाईमध्ये त्यांनी काही दारू विक्रेत्यांच्या चार चाकी वाहनांना आपल्या ताब्यात घेतले. इलियास सोबत राहुल चौधरी व अन्य आरोपींना फरार घोषित करण्यात आले. MH34 BG 1057 ही बोलेरा गाडी दारूसहित पोलिसांनी रामनगर पोलिस स्टेशन ला लावली. त्यानंतर इलिबास चे सगे सोबती यांचा शोध पोलिसांनी सुरू केला. यामध्ये रवि आंबोरकर, तिरूपती झाडे (ND), गोलु वर्मा, महेश कांबळे हे आरोपी फरार आहेत.
जिल्ह्यामध्ये-शहरामध्ये कोरोना चे संक्रमण रोखण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहेत. मग हे आरोपी गेले कुठे ? पोलिसांचे नेटवर्क मोठे आहे. आरोपींना पकडण्याची क्षमता आहे. मग दारू तस्कर किती दिवस आणि कसे फरार राहतात, त्याचा शोध घेण्याची जबाबदारी ही कुणाची आहे. प्रसार माध्यमांवर फरार आरोपींची छायाचित्रासहित माहिती कां बरे प्रकाशित केली जात नाही? याचा ही विचार या निमीत्ताने व्हायला हवा.
नागरिकांच्या सहकार्याशिवाय दारू बंदी होवू शकत नाही अशी ग्वाही देणारा जिल्हा पोलिस विभाग स्वतः केलेल्या कारवाया का बरे माध्यमांसमोर स्पष्ट करीत नाही ? विभागातील काही बेईमान पोलिसांमुळे आज संपूर्ण जिल्ह्यातील पोलिस विभागाची प्रतिमा डागाळली आहे. याचा विचार पोलिस विभागाने करायला हवा. माहिती देणान्यांची नांवे ही लपून राहत नाही आणि गोपनियतेच्या नावाखाली फरार आरोपींची नांवे लपवून ठेवल्या जातात. त्यांचा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय मात्र बेईमान पोलिसांच्या आशिर्वादामुळे सुरळीत सुरू राहतो. हे कुठले शासन ? अशी विचारण्याची वेळ आता सर्वसामान्यांवर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी जिल्यातील युवकांचे ऑयकॉन आहेत. त्यांनी या घटनांचा जिल्ह्यामध्ये असे पावेतो प्रकाश टाकायला हवा, असे यानिमीत्ताने म्हणावेसे वाटते.◼️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here