रेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर !

0
113

मुंबई : राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टारंट आणि बार सुरु करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत शनिवारी आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली. मिशन बिगीन अगेनअंतर्गत येत्या ५ ऑक्टोबरपासून ५0 टक्के क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्टस, रेस्टारंट आणि बार सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह यांनी रेस्टारंट आणि हॉटेल संघटनांना पत्राद्वारे नियमावलीची माहिती दिली. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने नियमावलीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे रेस्टारंट (कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, परवानाधारक फूड अँड बेव्हरेजेस (एफ अँड बी) युनिटस/आऊटलेटस, हॉटेल/ रिसॉर्ट/क्लब यांचा अंतर्गत किंवा बाह्य भाग यांसह) आणि बार यांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आस्थापनांसमवेत झालेल्या चर्चा, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, डब्ल्यूएचओ, युएनडब्ल्यूटीओ, केंद्रीय पर्यटन मंत्रालय यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच एफएसएसएआय यांनी कोरोनाकाळात अन्नसुरक्षेबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे ही नियमावली तयार करण्यात आली आहे.

अशी आहे नियमावली : 
* कोरोनाच्या लक्षणासंदर्भात सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात यावी.
* लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा.
* सेवा देताना किंवा प्रतिक्षा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा.
* खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे.
* आवश्यकतेनुसार ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देण्याबाबत त्यांची नाहरकत घेण्यात यावी.
* संबंधित आस्थापना चालकांनी ग्राहकांसाठी हँड सॅनिटायजर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. परिसरातील महत्वाच्या डिजीटल माध्यमाद्वारे चलन देण्यास प्रोत्साहन द्यावे. रोख चलनव्यवहार असल्यास चलनाची हाताळणी काळजीपूर्वक करावी.
* रेस्टरुम आणि हात धुण्याच्या जागांची (वॉशरुम) वेळोवेळी स्वच्छता (सॅनिटाईज) करण्यात यावी.
* काऊंटरवर कॅशिअर आणि ग्राहकांमध्ये शक्यतो प्लेक्सिग्लास स्क्रीन असावे.
* एसी वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निजंर्तुकीकरण करण्यात यावे.
* ग्राहकांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो जागेचे पूर्व आरक्षण करावे. आस्थापना चालकांनी सेवा देताना कोरोना रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतांबाबत तसेच वैयक्तिक स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आदीबाबत कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण घ्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here