Wednesday, March 22, 2023
Homeकोरोनातिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन

तिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन

मुंबई : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती असून उद्योजकांनी सज्ज राहून कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केले. कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योगांना केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील मुख्य उद्योगपतींशी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.

कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन कराव, या संदर्भात तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबवावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
यावर प्रतिसाद देतांना कोविडविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्‍व आपल्याबरोबर आहे, असा विश्‍वास राज्यातील प्रमुख उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांना दिला. राज्यात ज्याप्रमाणे आरोग्यविषयक टास्क फोर्स आहे तसेच कोविडसंदर्भात राज्य सरकारच्या समन्वयाने पुढील काळात काम करण्यासाठी उद्योगांचा एक टास्क फोर्स तातडीने निर्माण करावा, असेही निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले.
बैठकीत राज्याची निकड लक्षात घेऊन प्राधान्याने आपापल्या परीने ऑक्सिजनची उपलब्धता तातडीने करुन देण्यात येत आहे, असे उद्योगांच्या प्रतिनिधींनी सांगीतले. याशिवाय विलगीकरण बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे स्थापन करणे आणि लसीकरण वाढविणे यामध्ये उद्योग पुढाकार घेऊन लगेच कार्यवाही सुरू करतील, असेही सांगण्यात आले.
सर्व उद्योगपती हे राज्याच्या परिवारातले असून या संकटसमयी त्यांनी पुढे येऊन मदत करावी,असे कळकळीचे आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोविडसंदर्भातील सुविधा उभारणे किंवा याविषयी आवश्यक त्या बाबींमध्ये राज्य शासन तातडीने मदत करेल. या बैठकीस उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, दीपक मुखी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, संजीव बजाज, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी त्यागराजन, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, अश्‍विन यार्दी, एस. एन सुब्रमनियन, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, सुलज्जा फिरोदिया, समीर सोमय्या, आशिष अग्रवाल आदि उद्योगपती सहभागी होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील आपल्या सुचना मांडल्या तसेच उद्योगपतींना कोविडविषयक सुविधा उभारण्यात कुठलीही अडचण येऊ देणार नाही, असे सांगितले. राज्य शासनाकडून मुख्य सचिव सीताराम कुंटे, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, प्रधान सचिव सौरव विजय, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी पी अनबलगन आदींची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments