आगीची सीआयडी चौकशी करा-आम. मुनगंटीवार
चंद्रपूर : चंद्रपूर येथील चिचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्राच्या निर्माणाधीन इमारतीला गुरूवार, २५ फेब्रुवारी ला दुपारी आग लागली. ही इमारत बांबूपासून बनवण्यात येत होती. आग कशामुळे लागली व सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून काय उपाययोजना आखण्यात आल्या होत्या यासह इतर बाबींची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यंत्रणेला दिले आहेत. दरम्यान, आगीच्या ठिकाणी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देवून पाहणी केली. आगीत कोणतीही जीवितहाणी झाली नसून, सुमारे ९ ते १० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे
१०० कोटींच्या बांबू प्रशिक्षण केंद्राला लागलेल्या आगीची सीआयडी चौकशी करा- आम. मुनगंटीवार
शहरालगत वनविभागाच्या महत्वाकांक्षी बांबू संशोधन प्रकल्पाला भीषण आग लागली होती. या आगीत संशोधन केंद्राचं मोठं नुकसान झालं आहे. चिचपल्ली गावाजवळ हे जागतिक दर्जाचं निर्माणाधिन बांबू संशोधन केंद्र आहे. या १०० कोटींच्या बांबू प्रशिक्षण केंद्राला लागलेल्या आगीची सीआयडी चौकशी करा अशी मागणी माजी वनमंत्री सुधीर ङ्केमुनगंटीवार यांनी केली आहे. ही आग इतकी मोठी होती की आकाशात धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत होते.
आग लागली त्यावेळी सुरुवातीला प्रकल्पाच्या छतावर आगीचे लोळ उठलेले पाहायला मिळाले. त्यानंतर संपूर्ण छत आगीनं वेढलं. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. हा जागतिक कितीचा प्रकल्प सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रिम प्रोजेक्ट होता. जिल्हा, राज्य आणि देशातील वनांवर अर्थकारण असलेल्या ग्रामीण भागातील युवक-युवतींना हक्काचा रोजगार या केंद्राने मिळणार होता. आशिया खंडातील सर्वात मोठ्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची राख म्हणजे जिल्ह्याचे मोठे नुकसान असल्याची प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे.
अवघ्या ६ महिन्यात लोकार्पण होऊ घातलेल्या देखण्या संकुलाची आग नैसर्गिक की घातपात याची चौकशी करण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे. ही आग नैसर्गिक असेल तर खबरदारीच्या उपाययोजना का केल्या नाहीत? याचा तपास आवश्यक असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेची सीआयडी चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.