पोंभुर्णा येथील अगरबत्ती सिध्दीविनायकाच्या चरणी अर्पण होणे माझ्यासाठी अभिमानास्पद
आठवडी बाजाराचे लोकार्पण तर खुल्या नाटयगृहाचे भूमीपूजन थाटात संपन्न
आजवर पोंभुर्णा येथील नागरिकांनी विकासासंदर्भात जी मागणी केली ती आम्ही प्राधान्याने पूर्ण केली. जनतेला ईश्वराचा अंश मानत आम्ही त्यांची सेवा केली, या परिसराचा विकास केला. ज्या विश्वासाने पोंभुर्णा नगर पंचायतीची सत्ता आपण भाजपाच्या हाती सोपविली त्या विश्वासाला जागत आम्ही पोंभुर्णा शहराला विकासाच्या मार्गावर अग्रेसर केले. या पुढील काळातही विकासाचा हा रथ अधिक वेगाने पुढे नेत पोंभुर्णा शहराच्या विकासासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटेन, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
दिनांक 22 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा शहरात आठवडी बाजाराचे लोकार्पण व खुल्या नाटयगृहाचे भूमीपूजन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यानिमीत्ताने आयोजित जाहीर सभेत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा नेते प्रमोद कडू, पंचायत समितीच्या सभापती अलका आत्राम, पंचायत समितीच्या उपसभापती ज्योती बुरांडे, जि.प. सदस्य राहूल संतोषवार, नगर पंचायतीचे माजी अध्यक्ष गजानन गोरंटीवार, अजित मंगळगिरीवार, ऋषी कोटरंगे, किशोर नैताम, श्वेता वनकर, रजिया कुरैशी, आशिष देवतळे, चंदू मारगोनवार, नंदू रणदिवे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, पोंभुर्णा येथील नागरिकांनी जातीपातीच्या राजकारणाला कधिही थारा दिला नाही. नगर पंचायतीमध्ये भाजपाला सेवेची संधी दिली. या संधीचे सोने करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही विकासाचा धागा होत विकास प्रक्रिया मजबूत करण्याचा कायम प्रयत्न केला. जेव्हा पोंभुर्णा येथून उत्पादीत होणारी अगरबत्ती मुंबईतील श्री सिध्दीविनायकाच्या चरणी अर्पण होताना बघितली तेव्हा उर अभिमानाने भरून आला. पोंभुर्णा शहरात विकासाची दिर्घमालिका तयार करण्याचा प्रयत्न आम्ही केला. शहरातील मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरण, दुभाजक व पथदिवे बसविणे. पंचायत समितीच्या नविन इमारतीचे बांधकाम, ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम, आकर्षक वनविश्रामगृह, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी स्मृती इको पार्क, स्टेडियमचे बांधकाम आदींसह पोंभुर्णा शहर रोजगार निर्मीतीच्या दृष्टीने सुध्दा सुधीरभाऊंच्या पुढाकाराने अग्रेसर ठरले आहे. पोंभुर्णा शहरात महात्मा ज्योतीबा फुले सभागृहाचे बांधकाम, संताजी जगनाडे महाराज सभागृहाचे बांधकाम त्यांनी मंजुर करविले. पत्रकार भवनाचे बांधकाम पुर्णत्वास आले. बसस्थानकाचे बांधकाम मंजुर करण्यात आले आहे. ७ कोटी रु. किंमतीची पाणी पुरवठा योजना., भूमीगत नाली बांधकाम, चौक सौंदर्यीकरण, आधूनिक व्यायाम शाळा,आयटीआयचे नूतनीकरण, तलाव सौंदर्यीकरण आदी कामे मंजुर करण्यात आली असुन काही कामे प्रगतीपथावर आहेत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय जनतेच्या सेवेत रुजु झाले. आदिवासी मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहाचे बांधकाम मंजुर करण्यात आले. शहरात आरो मशीन द्वारे शुध्द पिण्याचा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणी स्वच्छता पार्कचे बांधकाम करण्यात आले आहे. आकर्षक व अत्याधुनिक अशा आठवडी बाजाराचे बांधकाम पुर्णत्वास आले आहे. या परिसरातील सांस्कृतीक चळवळीला वेग देण्यासाठी खुल्या नाटयगृहाचे बांधकाम सुध्दा होवु घातले आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. जेव्हा विधानसभेत क्रिडामंत्र्यांनी विधेयक सादर करताना बल्लारपूर येथील स्टेडियमचे कौतुक केले व माझे अभिनंदन केले तेव्हा मला बल्लारपूर, पोंभुर्णा, मुल येथील माझ्या नागरीक बंधू भगिनींची आठवण झाली, कारण तुम्हा सर्वांच्या प्रेमाच्या बळावरच ही विकास प्रक्रिया मी पुढे नेवू शकलो याची जाणीव मला आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
राज्य सरकारला सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखाशी कोणतेही देणेघेणे नाही. निराधारांचे अनुदान थकीत आहे, रमाई आवास योजनेचे पैसे थकीत आहे, लॉकडाऊनच्या कालावधीतील गरीबांचे विज बिल माफ करू अशी घोषणा सरकारने केली मात्र विज बिल तर रद्द केले नाही पण विज दरवाढ लादून जनतेला त्रास देण्याचे काम या सरकारने केले आहे. केवळ तिजोरीत पैसा नसल्याचे कारण देत सर्वसामान्य जनतेला हे सरकार वेठीस धरत असल्याची टिका यावेळी आ. मुनगंटीवार यांनी केली. या मतदार संघात आपण केवळ विकास आणि लोककल्याणाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी नेहमीच विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. यापुढील काळातही या भागात विकासाचाच विजय होईल असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
यावेळी आठवडी बाजाराचे लोकार्पण गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते तर खुल्या नाटयगृहाचे भूमीपूजन ज्येष्ठ नाटयकलावंतांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलका आत्राम यांनी केले तर संचालन नरेंद्र बघेल यांनी केले. कार्यक्रमाला पोंभुर्णा येथील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.