चंद्रपूर जिल्हयातील अवैध व्यवसायांची सीबीआय च्या माध्यमातुन चौकशी करावी – भाजपाची मागणी
देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचे जिल्हाधिका-यांना निवेदन सादर
चंद्रपूर :- जिल्हयातील माफीयाराज तातडीने थांबविण्याच्या दृष्टीने जिल्हयातील अवैध व्यवसायांची सीबीआय च्या माध्यमातुन चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत सदर निवेदन सादर केले.
या निवेदनाद्वारे भाजपातर्फे करण्यात आलेल्या मागणी पत्रात म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्हयात मोठया प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरू आहे. यावर शासन व प्रशासनाचा कोणताही प्रतिबंध नाही. वाळू तस्करी, दारू तस्करी, गँगवॉर अशा घटना सातत्याने जिल्हयात घडत आहेत. यात तस्करांसह अनेक तथाकथीत मोठी माणसे सहभागी आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. जिल्हयात दारू तस्करीला, अवैध दारूविक्रीला ऊत आला आहे. अवैध दारूविक्री करणा-यांचे गंभीर प्रकारचे संभाषण अर्थात त्या संभाषणाची ध्वनीफीत सध्या समाज माध्यमांवर मोठया प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही ध्वनीफीत ऐकल्यानंतर अवैध दारूविक्रीला राजकीय वरदहस्त असल्याचे स्पष्ट होते. वाळू तस्करीची प्रकरणे सुध्दा मोठया प्रमाणावर जिल्हयात सुरू आहेत. गँगवॉर च्या माध्यमातुन होणारे खून ही तर नित्याची बाब झाली आहे. चंद्रपूर जिल्हयात माफीयाराज अवतरल्याची परिस्थीती निर्माण झाली आहे. या सर्व अवैध व्यवसायांची सखोल चौकशी सीबीआय च्या माध्यमातुन होण्याची व माफीयाराज थांबविण्याची नितांत आवश्यकता असल्याचे भाजपाने निवेदनात म्हटले आहे.
सदर शिष्टमंडळात देवराव भोंगळे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, भाजयुमो महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.