सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेशाची वयोमर्यादा वाढवा; आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
मुंबई : कोव्हिडमुळे वित्त विभागाने राज्य तसेच जिल्हा स्तरावर कोणतीही शासकीय पद भरती करु नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील बेरोजगारांवर अन्याय होऊ नये, यासाठी शासकिय सेवा प्रवेशाची वयोमर्यादा एक वर्षाने वाढवा, अशी मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
यावर्षी नोकरभरती झाली असती तर काही उमेदवारांची निवड निश्चितपणे झाली असती व त्यांना शासकीय सेवेची संधी मिळाली असती. मात्र, यंदा ही भरती रखडल्याने बेरोजगारांचे आयुष्यभराचे नुकसान होऊ नये यासाठी शासकीय सेवेसाठीची वयोमर्यादा एक वर्षाने वाढविण्याची आवश्यकता आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्याेचे मुख्य सचिव यांना ई-मेल द्वारे मुनगंटीवार यांनी निवेदने पाठविली आहेत. कोरोनाचा सामना करताना राज्याची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे नवीन शासकीय भरतीस मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपत आली आहे. त्यांना पद भरती प्रक्रियेत सामिल होता येणार नाही. परिणामी या उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आले आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.◼️