पूर्व विदर्भातील पुराचे संकट हे अस्मानी संकटापेक्षा मानवी दोषांचे संकट आहे – आ. सुधीर मुनगंटीवार
29 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयातील मदतीच्या तरतूदी त्वरीत लागू कराव्या, 10 हजार रूप्यांची मदत तातडीने द्यावी
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला पुरग्रस्त भागाचा पाहणी दौरा
चंद्रपूर :– पूर्व विदर्भातील पुराचे संकट अतिशय गंभीर असून हे संकट अस्मानी संकटापेक्षा मानवनिर्मीत जास्त आहे. यात शासनाचा, शासनाच्या अधिका-यांचा दोष जास्त आहे. जर गोसीखुर्दचे पाणी सोडायचे होते तर नागरिकांना पूर्व सुचना दिली असती तर ही पुरपरिस्थीती इतक्या भिषण स्वरूपात पुढे आली नसती. गावांमध्ये पाणी शिरले, गावे पाण्याने वेढली गेली, घरांचे, शेतीचे अतोनात नुकसान झाले, कागदपत्रे वाहून गेलीत, शेतीचे शंभर टक्के नुकसान झाले आहे, एकाही विहीरीत किंवा बोअरींगमध्ये शुध्द पाणी राहिलेले नाही. त्यामुळे नागरिकांना तातडीची मदत मिळण्याची नितांत आवश्यकता आहे. भाजपा सरकारच्या काळात कोल्हापूर, सांगली भागात उदभवलेल्या पुरादरम्यान दिनांक 29 ऑगस्ट 2019 रोजी मदतीसंबंधीचा जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता तो या आपद परिस्थीतीत तसाच लागू करावा, त्यातील मदतीच्या रकमेत वाढ करावी. तातडीने पूरग्रस्तांना 10 हजारांची मदत करावी, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, केरोसिन पुढील तीन महिन्यांपर्यंत पुरग्रस्तांना पुरवावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. शासनाने पुरग्रस्तांची थट्टा करू नये व आमच्यावर आंदोलनाची पाळी आणू नये असा ईशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.
दिनांक 2 सप्टेंबर रोजी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपूरी तालुक्यातील बेलगांव, बेटाळा आणि पारडगांव आदी गावांना भेटी देत पुरपरिस्थीतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुरग्रस्तांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. यावेळी खा. अशोक नेते, आ. किर्तीकुमार भांगडीया, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, जिल्हा भाजपाचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्य संजय गजपूरे यांच्यासह भाजपा पदाधिका-यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा हे आदिवासीबहुल मागासित जिल्हे आहे. मानव विकास निर्देशांकात असलेल्या या जिल्हयांमध्ये आलेल्या या पुरपरिस्थीतीत हातावर पोट घेऊन जगणा-या नागरिकांना, शेतक-यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे तातडीने त्यांना 10 हजार रूपयांची मदत करत 29 ऑगस्ट 2019 चा शासन निर्णय लागू करण्याची आवश्यकता आहे किंबहुना त्यात आणखी मदत वाढविण्याची आवश्यकता आहे. रोगराई पसरु नये याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. शेती वाहून गेल्याने त्यात मोठया प्रमाणावर रेती आली असून ती काढण्याच्या दृष्टीने रोजगार हमी योजनेचे विशेष अभियान राबविण्याची आवश्यकता आहे. 29 ऑगस्ट च्या शासन निर्णयात ज्यांची घरे पूर्णपणे पडली त्यांना घरभाडयासाठी 24 हजार रूपये दिले ते तातडीने द्यावे, सर्व सरकारी योजना एकत्रित करून पुरग्रस्तांना मदत करावी अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. महाराष्ट्र सरकारने या आपद परिस्थीतीत कोणतीही कंजूषी न करता सढळ हाताने पुरग्रस्तांना मदत करावी असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.
पुरग्रस्त भागात भाजपातर्फे मदतकार्य सुरू असून भारतीय जनता पार्टी पुरग्रस्त नागरिकांच्या पुर्णपणे पाठीशी असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.