पुरग्रस्त गावांमध्ये भाजपातर्फे मदतकार्य सुरू, फुड पॅकेट्सचे वितरण
खा. अशोक नेते, आ. भांगडीया, प्रा. अतुल देशकर यांनी पुरग्रस्त भागांना भेटी देत पुरग्रस्तांना दिला धीर
चंद्रपूर :- वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठावर असलेल्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरून नागरिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. याचा फटका प्रामुख्याने ब्रम्हपूरी तालुक्यातील अनेक गावांना बसला आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे पुरग्रस्त गावांमध्ये मदत पोहचविण्याचे कार्य सुरू झाले असून खा. अशोक नेते, आ. किर्तीकुमार भांगडीया आणि माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी पुरग्रस्त गावांना भेटी दिल्या आहेत. पुरग्रस्त गावांमध्ये भाजपातर्फे फुड पॅकेट्स चे वितरण करण्यात येत आहे.
दिनांक 30 ऑगस्ट रोजी माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी पुरग्रस्त गावांना भेटी दिल्या. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांना काही पुरग्रस्त नागरिकांनी दुरध्वनीद्वारे पुराची भिषणता कळविली. मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या या दुरध्वनीची दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी प्रा. अतुल देशकर यांना कळविले. अतुल देशकर यांनी तत्परतेने 30 ऑगस्ट रोजी पुरग्रस्त भागाची पाहणी करत पुरग्रस्तांना धीर दिला. या आपदकाळात भारतीय जनता पार्टी पुरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे प्रा. अतुल देशकर म्हणाले.
दिनांक 31 ऑगस्ट रोजी खा. अशोक नेते, आ. किर्तीकुमार भांगडीया यांनी सुध्दा पुरग्रस्त भागांना भेट देत नागरिकांची विचारपूस केली. पुरग्रस्त गावांमध्ये झालेल्या नुकसानाचे सर्व्हेक्षण तातडीने करण्यात यावे व पुरग्रस्तांना त्वरीत मदत देण्यात यावी, अशी मागणी खा. अशोक नेते व आ. किर्तीकुमार भांगडीया यांनी केली. पुरग्रस्त भागांना पुरविण्यात येणा-या मदतकार्यामध्ये भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य संजय गजपूरे आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते अग्रेसर आहेत. ◼️