Wednesday, November 30, 2022
Homeचंद्रपूरमहाराष्ट्रात यावर्षी मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी ; हे कापूस उत्पादकांना न्याय देणारे वर्ष...

महाराष्ट्रात यावर्षी मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी ; हे कापूस उत्पादकांना न्याय देणारे वर्ष : ना.वडेट्टीवार

महाराष्ट्रात यावर्षी मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी ; हे कापूस उत्पादकांना न्याय देणारे वर्ष : ना.वडेट्टीवार

◼️जिल्ह्यात आतापर्यंत 30 लाख 44 हजार 226 क्विंटल कापूस खरेदी

◼️आतापर्यंत 1 लाख 63 हजार 616 शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी

चंद्रपूर,दि.25 जुलै: जिल्ह्यामध्ये धान (भात) पिकाबरोबरच कापूस पिक देखील घेण्यात येते. आतापर्यंत जिल्ह्यातून 1 लाख 63 हजार 616 शेतकऱ्यांकडून 30 लाख 44 हजार 226 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात यावर्षी सर्वाधिक खरेदी झाली आहे. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या खरेदीमुळे न्याय मिळाला असून हे वर्ष कापूस उत्पादकांना न्याय देणारे वर्ष ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

खरिपामध्ये धान उत्पादकांना गोसीखुर्द वरून आणखी पाणी मिळावे, गोसीखुर्दच्या पाण्याच्या वितरणातून चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाधिक भागामध्ये सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने जिल्ह्यात सुरु व्हावा, यासाठी त्यांनी नुकतीच नागपूर येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी वर्धा नदीच्या काठावर विस्तीर्ण प्रदेशात कापूस उत्पादकांची मोठ्या प्रमाणात संख्या असून या उत्पादकांना देखील सिंचनाचा कसा फायदा होईल, यासंदर्भात लवकरच आढावा घेतला असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना त्यांनी या वर्षी कापूस खरेदी संदर्भात जिल्हा प्रशासनाने एप्रिल, मे व जून महिन्यामध्ये केलेल्या पाठपुराव्याचे देखील कौतुक केले जिनिंग मालकांनी काही ठिकाणी उत्तम सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पुढील काळात देखील कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.

जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस तात्काळ खरेदी करता यावा यासाठी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात विविध बैठका घेण्यात आल्या. गरज पडली तेव्हा अन्य राज्यातून ग्रेडर आणले गेले. याचा फायदा होत शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी सुरू झाली.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी करावी असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. तसेच कापूस खरेदी संदर्भात जिनिंग-प्रेसिंग मालकांना निर्देश देण्यात आले होते. जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी 36 कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. या कापूस खरेदी केंद्राद्वारे शासकीय हमीभावाने कापूस खरेदी करण्यात येत आहे.

राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असून देखील पणन विभागाने विक्रमी 218.73 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. गेल्या 10 वर्षात झाली नाही अशी विक्रमी खरेदी या वर्षी झाली आहे. या खरेदीचे एकूण मुल्य 11,776.89 कोटी रुपये असून आतापर्यात 11,029.47 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.  तसेच सीसीआय ने 30 सप्टेंबर 2020 पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषित केले आहे.

राज्यात सीसीआय व राज्य कापूस पणन महासंघाने कोवीड-19 च्या प्रादुभावापूर्वी अनुक्रमे 91.90 व 54.03 लाख क्विंटल कापूस खरेदी. अशा प्रकारे एकूण 145.93 क्विंटल कापूस खरेदी केली.

कोविड-19च्या प्रादुभावामुळे कापसाचे बाजारातील दर हमीपेक्षा कमी असल्यामुळे, शेतकऱ्यांचा कल, शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याचा होता.  त्यानुसार शासकीय खरेदी नियोजन करून कोविड-19 च्या काळात सीसीआय व कापूस पणन महासंघाने आजपर्यंत अनुक्रमे 35.70 व 36.75 लाख याप्रमाणे 72.45 लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे.

राज्यातील शासकीय व खासगी अशी एकूण खरेदी 418.8 लाख क्विंटल झाली असून वास्तविक पहाता 410 लाख क्विंटल कापूस खरेदी अपेक्षित होती.  एकूण 8 लाख 64 हजार 72 शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत सीसीआय मार्फत 4 लाख 31 हजार 885  क्विंटल कापसाची खरेदी केली तर राज्य कापूस पणन महासंघाने  2 लाख 10 हजार 137  क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. थेट पणन परवानाधारकामार्फत 4 लाख 82 हजार 700 क्विंटल तसेच बाजार समिती परवानाधारक यांच्यामार्फत 19 लाख 19 हजार 503 क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.◼️

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments