Home चंद्रपूर लॉकडाऊनच्‍या कालावधीतील गोरगरीब नागरिकांचे विज बिल माफ करावे – भाजपाची मागणी

लॉकडाऊनच्‍या कालावधीतील गोरगरीब नागरिकांचे विज बिल माफ करावे – भाजपाची मागणी

0

दिनांक 17 जुलै रोजी चंद्रपूर जिल्‍हात भाजपाचे आंदोलन

लॉकडाऊनच्‍या कालावधीतील गोरगरीब नागरिकांचे विज बिल माफ करावे या प्रमुख मागणीसह अन्‍य मागण्‍यांसाठी भाजपातर्फे दिनांक 17 जुलै रोजी चंद्रपूर जिल्‍हयात राज्‍य सरकारच्‍या विरोधात आंदोलन करण्‍यात येणार असल्‍याची माहिती भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावामुळे गेल्‍या तीन महिन्‍यापेक्षा जास्‍त कालावधीपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्‍यामुळे गोरगरीब जनता संकटात सापडली आहे. कष्‍टकरी वर्ग, शेतकरी बांधव आदी घटक आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. मोठया प्रमाणावर विज बिले नागरिकांना प्राप्‍त झाली आहे. ते भरण्‍यास नागरीक पूर्णपणे असमर्थ आहेत. त्‍यामुळे सदर विज बिल माफ करण्‍यात यावे तसेच एप्रिल 2020 पासून केलेली विजेची दरवाढ मागे घेण्‍यात यावी, अशी मागणी भाजपातर्फे करण्‍यात येत आहे. चंद्रपूर जिल्‍हयात रमाई आवास योजनेअंतर्गत चौदा हजारापेक्षा जास्‍त लाभार्थी आहेत. या योजनेचा निधी लाभार्थ्‍यांना न मिळाल्‍यामुळे सदर नागरिक अडचणीत आले आहे. तो निधी सुध्‍दा तातडीने देण्‍याची आवश्‍यकता आहे. विद्यमान शासनाने कर्जमाफी जाहीर केली, मात्र अद्याप अनेक शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे तसेच अनेक शेतक-यांच्‍या कर्जाचे पुनर्गठन सुध्‍दा झालेले नाही. त्‍यामुळे हंगामाच्‍या तोंडावर शेतकरी आर्थिकदृष्‍टया हवालदिल झालेला आहे. या आर्थीक संकटातुन शेतक-याला बाहेर काढण्‍याची आवश्‍यकता आहे. तसेच शेतक-यांना युरीया व संबंधित खते तातडीने उपलब्‍ध करण्‍याची आवश्‍यकता आहे.

बारा बलुतेदार व गोरगरीबांना राज्‍य सरकारतर्फे पॅकेज देण्‍यात यावे अशी मागणी आम्‍ही सातत्‍याने करीत आहोत. मात्र राज्‍य सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हातावर पोट घेवून जगणा-यांसमोर उदरनिर्वाहाची समस्‍या निर्माण झाली. त्‍यामुळे गोरगरीबांचे जगणे कठीण झाले आहे. या सर्व समस्‍यांकडे निद्रीस्त असलेल्‍या शासनाचे लक्ष वेधण्‍यासाठी आम्‍ही दिनांक 17 जुलै रोजी जिल्‍हाभर आंदोलन छेडण्‍यात येणार आहे. या आंदोलनात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांनी सोशल डिस्‍टंसींगचे पालन करत सहभागी व्‍हावे असे आवाहन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्‍यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, आ. किर्तीकुमार भांगडीया, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, उपाध्‍यक्षा रेखा कारेकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी आमदार अॅड. संजय धोटे, भाजपाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्‍य हरीश शर्मा, राजेंद्र गांधी, खुशाल बोंडे, संजय गजपूरे, राहूल सराफ, राजेश मुन, सौ. रेणुका दुधे, ब्रिजभूषण पाझारे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here