◼️सोशल मीडियाची कमाल, 41 वर्षानंतर हरवलेल्या आजीबाई सापडल्या..!!
वास्तव हे कल्पनेपेक्षा विचित्र असते असे म्हणतात. ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे 94 वर्षाच्या नागपूरच्या पंचफुलाबाई. साल 1979 मध्ये पंचुबाई ‘मिसिंग’ झाल्या, पण चक्क 41 वर्षानंतर त्या ‘सापडल्या’ आहेत ! पण ही कहाणी नुसती “मिसिंग आणि फाऊंड” ची नसून, मानवतेची , प्रेरणादायी कहाणी आहे.
भारतातील ‘ताजमहाल’ प्रेमाचे प्रतिक म्हणून जगप्रसिद्ध आहे. सध्या भारतासोबतचं पाकिस्तानात ‘पंचुबाई’ नावाच्या एका ९४ वर्षीय वृद्धेची कहाणी सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. विविध जातीधर्माच्या एकोप्याची ओळख असलेल्या भारताला या घटनेने एका मानाचा तुरा रोवला आहे. हिंदु कुटूंबात जन्मलेली “पंचुबाई’ एका दुर्घटनेचा शिकार झाली आणि ४० वर्षापेक्षा जास्त काळ तिचे पालन पोषण मुस्लिम कुटूंबाने केले. अतिशय मार्मिक व बोधक ठरणाऱ्या या वास्तव घटनेने साऱ्या जगासमोर भारताची मान उंच केली आहे. __ या घटनेला जाणून घेण्यासाठी ‘फ्लॅश बॅक’ मध्ये जावे लागेल. ४० वर्षापुर्वी मध्यप्रदेशातील दमोह येथे एका बस स्टँडवर नूर खान नावाच्या एका ट्रक चालकाला एका महिला बेशुद्धावस्थेत आढळली. मधमाशांनी हल्ला केल्यामुळे ती महिला जखमी झाली होती. नूर खान यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने या महिलेला वाचविले आणि आपल्या घरी घेऊन गेले. मानसिक आजाराने ग्रस्त असलेली फक्त मराठी भाषा बोलत असलेल्या या महिलेची भाषा नूर खान यांच्या कुटुंबाला कळत नव्हती. काही वर्षानंतर नुर खान काही कारणास्तव नागपूर ला आले, त्यावेळी त्यांनी नागपूरच्या सिताबर्डी पोलिस ठाण्याला आपलेकडे एक महिला राहत असून ती कुठे राहते याची कल्पना नसल्याची तक्रार दिली. दुसरीकडे १९७९ मध्येच पंचूबाईच्या कुटुंबियांनी लकडगंज पोलिस ठाण्यात पंचूबाईच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती. परंतु सिताबर्डी व लकडगंज पोलिस ठाण्यामध्ये सामंजस्य नसल्यामुळे त्या दोन ही तक्रारीचे काहीही होवू शकले नाही. दिवसामागून दिवस जात गेले. पंचुबाई मुस्लिम नुर खान च्या कौटूंबिक सदस्य झाल्यात. ‘मौसी’ म्हणून त्या संपूर्ण गावामध्ये ओळखल्या जावू लागल्या. काही वर्षानंतर नूर खान यांचे निधन झाले. नूर खान यांची दुसऱ्या पिढीचा ही ‘मौसी’ ला लळा लागला.
__ आत्ता वेळ ‘फ्लॅश बॅक’ मधून निघायची आहे. सोशल माध्यमांचा वापर आणि प्रभाव वाढलेल्या या काळामध्ये काही दिवसांपूर्वी नुर खान यांचा मुलगा इसरार याने ‘मौसी च्या तोंडून परसापूर हे नांव ऐकले. गुगल वर जाऊन त्यांनी महाराष्ट्रातील परसापूर असे शोधले असता. अमरावती जिल्ह्यामधील एका गावाचे नांव परसापूर असल्याचे त्यांना कळले. तंत्रज्ञानाच्या वापर करीत त्यांनी परसापूर मधील एका स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला. व त्या संस्थेच्या अभिषेक नावांच्या कार्यकर्त्याला पंचूबाईचा व्हिडीओ काढून तो पाठविला. अवघ्या काही तासातचं हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला व तो पंचुबाई च्या कुटुंबातील नागपूर येथे राहणारा त्यांचा नातू पृथ्वी शिंगणे यांच्या मोबाईलवर आला. मग पृथ्वीने इसरार यांच्याशी संपर्क साधून हा व्हिडीओ त्यांच्या आजीचा असल्याची कल्पना दिली. व त्यांच्या घराचा पत्ता विचारून शिंगणे कुटूंबियांनी मध्यप्रदेशातील दमोह गाठले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजी पंचुबाई हरविल्यानंतर तिन महिन्यानंतर पृथ्वी शिंगणे यांचा जन्म झाला असल्यामुळे ते व्हिडीओवरून आपल्या आजीला ओळखू शकले नाही आणि त्यांच्या घरात ही आजीचा कोणताही फोटो नव्हता. परंतु पृथ्वी शिंगणे यांची आई सुमनबाई शिंगणे यांनी सोशल मिडीयावर फोटो बघितल्यावर ही आपली सासुचं असल्याची पुष्टी केली व शिंगणे कुटुंब ४० वर्षापेक्षा ही जास्त अवधीत हरविलेल्या आपल्या सदस्याला घेण्यासाठी नूर खान यांच्या घरी गेले. शिंगणे कुटुंबाला आपले घरातील सदस्य मिळाल्याचा आनंद होता तर नूर खान यांच्या कुटूंबाला चार दशकापेक्षा जास्त काळ कौटुंबिक सदस्य बिछडत असल्याचे दुःख होते. अत्यंत मार्मिक असलेल्या या कौटुंबिक विरह क्षणाला अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केले. हा व्हिडीओ नंतर मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल झाला. पाकिस्तानमध्ये ही या व्हिडीओ ची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि भारताच्या एकता व अखंडतेचे गोडवे पाकिस्तानमध्ये गाण्यात येवू लागले आहेत. __ सोशल मिडीयाच्या माध्यमातून चार दशकांपेक्षा ही जास्त काळानंतर या कुटुंबातील सदस्याला त्यांचे स्वतःचे घर मिळवून दिले. सोशल माध्यमांच्या या सकारात्मक बाजुकडे ही समाज तेवढ्याच आदराने बघत आहे.◼️