ऊर्जा मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, नागपूर परिमंडलातील ४ लाख ४० हजार
नागपूर ,दि. ०६ जुलै २०२०
लॉकडाऊनंतर मीटर रीडिंगप्रमाणे दिलेले तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिलाबाबत ग्राहकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले होते.त्यानुसार नागपूर परिमंडलात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. परिणामी ग्राहकांचे समाधान झाल्यामुळे बिल भरण्याच्या उर्जामंत्रांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत नागपूर परिमंडलात ३० जूनपर्यंत सुमारे ०४ लाख ४० हजारापेक्षा जास्त ग्राहकांनी त्यांच्या १४३ कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा केला आहे. त्यापैकी सुमारे २ लाख ८७ हजार ग्राहकांनी मागील १५ जून ते ३० जून या पंधरा दिवसात वीज बिल भरणा केला आहे.दरम्यान ज्या ग्राहकांची वीज बिल भरण्याची अंतिम मुदत संपली आहे, ती मुदत ८ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ग्राहकांच्या मनातील बिलाबाबतची शंका दूर करण्यासाठी नागपूर परिमंडलात मागील पंधरा दिवसांपासून सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक मदत कक्ष स्थापन करून ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येत आहे. या शिवाय ग्राहक शिबिरे, वेबिनारचे आयोजन करून वीजबिल समजून सांगण्यात येत आहे. तसेच ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संपर्क, ‘एसएमएस’, व्हॉटस अप मेसेज पाठवून बिलासंदर्भात माहिती देण्यात येत आहे.
महावितरणच्या या जनजागृती मोहिमेला प्रतिसाद देत ३० जून अखेरपर्यंत नागपूर परिमंडलातील सुमारे ४ लाख ४४ हजार ३९४ ग्राहकांनी १४३ कोटी २८ लाख ७६ हजार ४९७ रुपयांचे वीजबिल भरले आहे.यात नागपूर शहर मंडलातील सुमारे २ लाख ९३ हजार ५६७,नागपूर ग्रामीण मंडलातील सुमारे ७८ हजार २९४ तर वर्धा मंडलातील ६८ हजार ५३३ ग्राहकांचा समावेश आहे.
ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार, महावितरणने जून किंवा जुलै २० मध्ये एकत्रित आलेल्या वीज देयकांची रक्कम (थकबाकीसहित) एकरकमी भरल्यास एकत्रित आलेल्या एकूण रकमेच्या २% सूट ही पुढच्या महिन्याच्या देयकात समायोजित करून मिळणार आहे.ज्या ग्राहकांनी देयकाची रक्कम भरलेली आहे त्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे,तसेच ज्या ग्राहकांच्या देय तिथी निघून गेल्या आहेत त्यांच्या देय तिथी म्हणजेच वीज देयक भरण्याची मुदत ०८ जुलै पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे.तसेच जे ग्राहक ऑनलाईन पद्धतीने वीज देयकांचा भरणा करतील त्यांना ०.२५% डिजिटल पेमेंट भरणा सूट ही वेगळी मिळणार आहे. (याबाबतची अधिक माहिती ग्राहकांच्या वीज देयकांवर दिलेली आहे)तसेच जे ग्राहक एकरकमी वीज देयकाची रक्कम भरू शकत नसतील त्यांचेसाठी सुलभ ३ हफ्ते पाडून देण्यात आलेले आहेत.जून किंवा जुलै ची जी एकत्रित देयकाची रक्कम असेल त्याचे ३ समान मासिक हफ्ते करून ग्राहक ऑनलाईन किंवा वीज देयक भरणा केंद्रावर रक्कम भरू शकतील.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असून तक्रारी घेऊन कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांचे समाधान करण्यासाठी महावितरणकडून पुरेपुर काळजी घेतल्या जात आहे.कोरोनाचे भय संपले नसल्याने वीजबिलाची तक्रार घेऊन येण्यापुर्वी ग्राहकानी महावितरणच्या https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ लिंकवर जाऊन एकदा आपल्या वीजबिलाची पडताळणी करावी, असे आवाहनही नागपूर परिमंडलाकडून करण्यात येत आहे.तसेच उर्वरित ग्राहकांनीही आपले वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता (प्रभारी) दिलीप दोडके यांनी केले आहे.
संलग्नके क्षेत्र