चंद्रपूर:
जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोना संक्रमित तीन रुग्ण आढळून आल्याने आत्तापर्यंत कोवीड संक्रमित झालेल्या बाधितांची  संख्या १२१ झाली आहे. यापूर्वीचे ६२ बाधित रोग मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या ५९ बाधित उपचार घेत आहेत.
       जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार ऊर्जा ग्राम येथील ३५ वर्षीय महिला कर्मचारी यांचा काल घेतलेला स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे. त्यापाठोपाठ त्यांचे ४० वर्षीय पती यांचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कुटुंबातील अन्य तिघांचा देखील स्वॅब घेण्यात आला आहे.
       चिमूर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह पहिली घटना पुढे आली आहे. तालुक्‍यातील सोनेगाव येथील ३५ वर्षीय नागरिक पॉझिटिव्ह आला आहे. नागपूर येथून आल्यानंतर १ जुलैपासून संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या या नागरिकाचा स्वॅब २ जुलै रोजी घेण्यात आला होता. या तीन नागरिकांमुळे रविवारी सायंकाळपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह संख्या १२१ वर गेली आहे.