झरी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव,

0
68

झरी : प्रतिनिधि

वणी नंतर आता झरी तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तालुक्यातून यवतमाळ येथे उपचारासाठी गेलेल्या महिलेचा व तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला असून त्या महिलेची कोरोनाची चाचणी केली असता ती पॉजिटिव्ह आली आहे. दरम्यान प्रशासन सतर्क झाले असून या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की झरी तालुक्यातील महादापूर येथील महिलेला लग्नानंतर मेटिखेडा जवळील रुढा या गावी दिले होते. ती गर्भवती असल्याने ती 10 मार्च रोजी माहेरी आली होती. 13 मार्चला ती सोनोग्राफीसाठी अदिलाबाद येथे गेली होती. काल गुरुवारी दिनांक 2 जुलै रोजी पोट दुखत असल्याने तिला झरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. संध्याकाळी 5.30 ते रात्री 10 पर्यंत सदर महिला ही तिथेच होती. मात्र प्रसुती कळा येत नसल्याने त्या महिलेला पांढरकवडा येथे उपचारासाठी रेफर केले. पांढरकवडा येथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. रातोरात तिला यवतमाळला हलवण्यात आले.

सकाळी महिलेला प्रसुती कळा आल्या. मात्र प्रसुती होताच काही वेळातच नवजात बाळाचा मृत्यू झाला. थोड्या वेळात महिलेला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. तिथल्या डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी तिला लगेच कॉरन्टाईन कक्षात भरती केले. तिचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र तपासणी रिपोर्ट येत पर्यंत सदर महिलेचा मृत्यू झाला होता. रिपोर्ट आल्यावर सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली, कारण सदर महिलेचा रिपोर्ट पॉजिटिव आला. दरम्यान याची माहिती लगेच तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here