अहेरीत ‘एसीबी’चा दणका! १.२० लाखांची लाच स्वीकारताना भाजपचा स्वीकृत नगरसेवक जाळ्यात

अहेरी, दि. १५ ऑक्टोबर : नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विद्युत कामांच्या मोबदल्यात ठेकेदाराकडे तीन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अहेरीत सापळा रचला. अहेरी नगरपंचायतीचे भाजपचे स्वीकृत नगरसेवक अमोल विलासराव गुडेलीवार (वय ४०) यांना त्यांच्या हार्डवेअर दुकानात एक लाख २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती विभागाने दिली.

तक्रारदार हे ३३ वर्षीय परवानाधारक इलेक्ट्रिकल ठेकेदार असून, त्यांच्या मित्राच्या ठेकेदारी फर्मला नगरोत्थान योजना २०२५–२६ अंतर्गत अहेरीतील प्रभाग क्रमांक १ ते १० आणि प्रभाग क्रमांक ११ ते १७ मध्ये अतिरिक्त सर्व्हिस केबल टाकण्याची कामे मिळाली होती. या दोन्ही कामांची एकूण मंजूर निविदा रक्कम १९ लाख ८७ हजार ७६५ रुपये होती. तक्रारदारांनी मित्रासोबत करार करून संबंधित कामे पूर्ण केली होती. निर्धारित १८० दिवसांच्या मुदतीत कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांची बिलेही अदा करण्यात आली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालानुसार, ही कामे जिल्हा नियोजन समितीतून आपण मंजूर करून आणली असून ती आपल्या कोट्यातील असल्याचा दावा गुडेलीवार यांनी केल्याचा आरोप आहे. या कामांच्या बिलांच्या १५ टक्के रकमेप्रमाणे तीन लाख रुपये देण्याची मागणी त्यांनी ठेकेदाराकडे केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या मागणीपोटी ५ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रारदारांनी ३० हजार रुपये रोख दिले होते. मात्र, त्यानंतरही व्हॉट्सॲप कॉलद्वारे उर्वरित दोन लाख ७० हजार रुपयांसाठी तगादा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वारंवार होणाऱ्या लाच मागणीला कंटाळून तक्रारदारांनी गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, १५ ऑक्टोबर रोजी पंचांच्या उपस्थितीत मागणीची पडताळणी करण्यात आली. तक्रारदारांना ध्वनिमुद्रकासह गुडेलीवार यांच्या हार्डवेअर दुकानात पाठविण्यात आले. यावेळी उर्वरित दोन लाख ७० हजार रुपयांची मागणी करून सध्या उपलब्ध असलेली रक्कम आणून देण्यास सांगितल्याचे विभागाच्या अहवालात नमूद आहे. तक्रारदारांनी एक लाख २० हजार रुपये उपलब्ध असल्याचे सांगितल्यानंतर ती रक्कम दुकानात आणण्यास सांगण्यात आले.

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार पंचांसह लाचेची रक्कम घेऊन दुकानात गेले. गुडेलीवार यांनी एक लाख २० हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे विभागाने स्पष्ट केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही अहवालात नमूद आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक दिंगबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत करपे यांच्यासह संजयकुमार बोहरे, मंगेश कहालकर, संतोष शेंडे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे आणि दीपक बाटबर्वे यांनी कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, भ्रष्टाचारासंबंधी माहिती किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

महाराष्ट्र–तेलंगणा सीमेवर पोलिसांची करडी नजर; वांगेपल्ली येथे पोलीस चौकी कार्यान्वित

अहेरी : महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या अहेरी येथील वांगेपल्ली पुलाजवळ अवैध धंदे आणि मद्य तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा वाहतूक शाखा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शना खाली तसेच अहेरी वाहतूक पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक श्री. मेश्राम यांच्या निर्देशानुसार या ठिकाणी सहा पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. सीमावर्ती भागातून होणाऱ्या बेकायदेशीर हालचालींवर नियंत्रण ठेवणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

महाराष्ट्र–तेलंगणा सीमेवरील वांगेपल्ली पूल हा या भागातील महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून होणारी अवैध मद्य वाहतूक तसेच इतर बेकायदेशीर व्यवहार रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष देखरेख ठेवली जाणार आहे. चौकी कार्यान्वित झाल्यामुळे सीमावर्ती भागातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, वाहनांची तपासणी करणे आणि बेकायदेशीर व्यवहार आढळल्यास तातडीने कारवाई करणे अधिक सुलभ होणार आहे.

गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अहेरी पोलीस  स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मेश्राम यांच्या नियोजनानुसार वांगेपल्ली येथील पोलीस चौकीवर सहा कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. यामध्ये संजय चक्कावार (सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक), मोहन तुलावि (हवालदार), दत्तू मडेमवार (पोलीस शिपाई), विजय करमे (पोलीस शिपाई), रोहित मोहुर्ले (पोलीस शिपाई) आणि ज्ञानेश्वर नीलावार (पोलीस नाईक शिपाई) यांचा समावेश आहे. हे कर्मचारी चौकीच्या माध्यमातून परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवून सीमावर्ती भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.

वांगेपल्ली पुलाजवळ पोलीस चौकी कार्यान्वित झाल्याने अवैध मद्य तस्करी आणि इतर बेकायदेशीर धंद्यांवर नियंत्रण मिळविण्यास पोलिसांना मदत होणार आहे. नियमित गस्त, वाहनांची तपासणी आणि संशयास्पद हालचालींवर देखरेख ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच अल्पवयीन मुलांकडून विनापरवाना गाडी चालवणे यावर ही आळा बसणार आहे त्यामुळे सीमावर्ती भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अधिकारी नव्हे, शिक्षक बनून BEO सुरज वागस्कर वर्गात!

अहेरी : ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासह शाळांमधील व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अहेरीचे गटशिक्षणाधिकारी सुरज वागस्कर यांनी शाळांच्या अचानक तपासणीची मोहीम सुरू केली आहे. १३ ऑक्टोबर रोजी त्यांनी पेरमिली केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडपल्ली आणि भगवंतराव हायस्कूल, पेरमिली येथे भेट देऊन शैक्षणिक स्थिती, पोषण आहार, स्वच्छता आणि भौतिक सुविधांची पाहणी केली. त्यांच्या अनपेक्षित भेटीमुळे शालेय वर्तुळात चांगलीच धावपळ उडाली.

अधिकारी म्हणून केवळ निरीक्षण न करता वागस्कर यांनी शिक्षकाची भूमिका बजावत स्वतः वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना अध्यापन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आणि ज्ञानपातळीचा आढावा घेतला. पायाभूत अंकगणित, पाढे आणि अक्षरओळख यांसारख्या मूलभूत कौशल्यांवर विशेष भर देण्याचे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले. विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी अध्यापनात सातत्य आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यानंतर भगवंतराव हायस्कूल, पेरमिली येथे भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची स्थिती जाणून घेतली. यावेळी शाळेतील शालेय पोषण आहाराचा साठा व गुणवत्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, क्रीडांगण आणि इतर भौतिक सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत, तसेच शैक्षणिक वातावरण समाधानकारक आहे की नाही, याची त्यांनी बारकाईने तपासणी केली.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण आणि बौद्धिक विकास हाच शिक्षणाचा मुख्य उद्देश असला पाहिजे, असे स्पष्ट करत वागस्कर यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याचे निर्देश दिले. तालुक्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शाळांच्या अचानक तपासणीची मोहीम नियमितपणे सुरू राहणार असून, शैक्षणिक व प्रशासकीय बाबींवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या उपक्रमामुळे शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यवस्थापन सुधारण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

बसस्थानकात अस्वच्छता, अंधार आणि सुरक्षेचा अभाव; समस्यांवर तोडगा काढण्यासाठी युवकांचा प्रशासनाला इशारा

आलापल्ली : पाच तालुक्यांना जोडणारे महत्त्वाचे वाहतूक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलापल्ली बसस्थानकातील विविध समस्यांमुळे प्रवासी, विद्यार्थी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. बसस्थानकातील अस्वच्छता, बंद पंखे व विद्युत दिवे, तुटलेले बेंचेस आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक युवकांनी अहेरी आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या समस्यांचे १५ दिवसांत निराकरण न झाल्यास पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा युवकांनी दिला आहे.

महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; मूलभूत सुविधांची दुरवस्था! बाहेरगावाहून रात्री उशिरा आलापल्ली येथे पोहोचणाऱ्या प्रवाशांना पुढील प्रवासासाठी बस उपलब्ध होत नसल्याने बसस्थानकातच रात्र काढावी लागते. अशा वेळी महिला प्रवाशांसह इतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. काही प्रवाशांचे पैसे व मोबाईल चोरीला गेल्याच्या घटनाही घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच स्वच्छतागृहाची पाइपलाइन फुटल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. बंद पंखे, रात्रीच्या वेळी बंद असलेले विद्युत दिवे आणि तुटलेले बेंचेस यांमुळे प्रवाशांच्या गैरसोयीत आणखी भर पडत आहे. त्यामुळे बसस्थानकावर २४ तास सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून मूलभूत सुविधा तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

१०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी एकच बस; शैक्षणिक नुकसान रोखणार कोण? आलापल्ली ते मूलचेरा मार्गावरील अपुऱ्या बससेवेचा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर या मार्गाने जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १०० हून अधिक असल्याचे सांगण्यात येते; मात्र विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच बस सोडली जात असल्याने मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना वेळेत घरी पोहोचता यावे, यासाठी शाळेची सुट्टीही दुपारी ४ वाजता करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तरीही बसअभावी विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात असून त्यांच्या शैक्षणिक बाबींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन मूलचेरा मार्गावर अतिरिक्त बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी आग्रही मागणी युवकांनी केली आहे.

१५ दिवसांची मुदत; अन्यथा कायदेशीर लढ्याचा इशारा! बसस्थानकातील सुरक्षा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांसह मूलचेरा मार्गावरील बससेवेच्या प्रश्नावर युवकांनी आगार व्यवस्थापकांशी चर्चा करून निवेदन दिले. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित या समस्यांकडे दुर्लक्ष न करता येत्या १५ दिवसांत ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत समस्यांचे निराकरण न झाल्यास पुन्हा आगारात येऊन योग्य ती कायदेशीर पावले उचलण्यात येतील, असा इशाराही युवकांनी दिला. आता अहेरी आगार प्रशासन या मागण्यांची कितपत दखल घेते आणि आलापल्लीकरांना दिलासा देण्यासाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वाचनातून ज्ञान, बचतीतून शिस्त; ताटीगुडम शाळेत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन

ताटीगुडम : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, ताटीगुडम येथे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच बँकिंगविषयी जागरूकता वाढावी, या उद्देशाने वाचन व बँकिंग जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत बँक ऑफ इंडिया, कमलापूर शाखेचे शाखा अधिकारी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून बँकिंगविषयक विविध बाबींची सोप्या आणि रंजक पद्धतीने माहिती दिली.

 

यावेळी शाखा अधिकाऱ्यांनी बँकेची कार्यपद्धती, पैशांची बचत करण्याचे महत्त्व, आर्थिक शिस्त आणि बँकेच्या विविध सेवांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी बँकेमार्फत उपलब्ध असलेल्या विविध योजना व सुविधांची माहिती देत आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. या संवादामुळे विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्राची प्राथमिक माहिती मिळण्यास मदत झाली.

 

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन मिळावे, या हेतूने शाखा अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके व पेन भेट दिले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजण्यासोबतच नियमित अभ्यास, ज्ञानार्जन आणि बचतीची सवय यांविषयी सकारात्मक संदेश मिळाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व यावेळी अधोरेखित झाले.

 

‘वाचनातून ज्ञान, बचतीतून शिस्त आणि शिक्षणातून उज्ज्वल भविष्य!’ या संदेशातून उपक्रमाचा उद्देश प्रभावीपणे व्यक्त झाला. विद्यार्थ्यांना बँकिंगविषयक माहिती देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणा दिल्याबद्दल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, ताटीगुडम यांच्या वतीने बँक ऑफ इंडिया, कमलापूर शाखेचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन, बचत आणि शिक्षणाविषयी अधिक जागरूकता निर्माण होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण; आलापल्ली शहरात पक्षाच्या फलकांचे अनावरण

आलापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आलापल्ली शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पक्षाच्या फलकांचे अनावरण करण्यात आले. आलापल्ली शहरात प्रथमच अशा स्वरूपात पक्षाचे फलक लावण्यात आल्याने स्थानिक शिवसैनिक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच युवा सेनाप्रमुख आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दिलीप भाऊ सुरपाम यांच्या उपस्थितीत शहरातील विविध ठिकाणी पक्षाच्या फलकांचे अनावरण करण्यात आले.

आलापल्ली शहर व परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच नागरिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच जनसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर योग्य तो पाठपुरावा करण्यासाठी शिवसैनिकांनी एकजुटीने कार्यरत राहण्याचे आवाहन करण्यात आले.

या फलक अनावरण कार्यक्रमाला विभागप्रमुख सचिन सलामे, आकाश तुमडे, संजय फुलोर, राकेश आत्राम, सागर गोंगले, तिरुपती रामगिरवार, व्यंकटेश बंदूकवार, विजय वानखेडे, वसंत आलाम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नन्हे सितारे विभागीय स्पर्धेत लोक बिरादरीचे सात विद्यार्थी चमकले

भामरागड : आदिवासी विकास विभागांतर्गत ओपन लिंक फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘नन्हे सितारे’ उपक्रमाच्या विभागीय स्पर्धेत लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. ३० सप्टेंबर २०२६ रोजी शासकीय आश्रमशाळा, कवडस, ता. हिंगणा, जि. नागपूर येथे झालेल्या या स्पर्धेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड अंतर्गत लोक बिरादरी आश्रमशाळेचे आठ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी तब्बल सात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवत आपल्या शाळेचा नावलौकिक वाढविला.

आदिवासी विद्यार्थ्यांमधील इंग्रजी संवादकौशल्य, आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सार्वजनिक सादरीकरणाची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने ‘नन्हे सितारे’ उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपूर विभागातील विविध एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधून इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. प्रत्येक प्रकल्पातून ११ ‘नन्हे सितारे’ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना आपली कला व प्रतिभा सादर करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. त्याच उपक्रमांतर्गत कवडस येथे विभागीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

लोक बिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. इयत्ता पहिली ते तिसरी गटात कथा सादरीकरणात समीक्षा नितीन मायनाळे हिने तृतीय, तर कविता सादरीकरणात अनन्या बाबुराव कोंडागुर्ले हिने तृतीय क्रमांक मिळविला. इयत्ता चौथी ते पाचवी गटात कथा सादरीकरणात कार्तिक प्रकाश सोयाम याने प्रथम, स्पोकन इंग्लिशमध्ये काव्यांजली दशरथ कोरेत हिने प्रथम, कविता सादरीकरणात शर्मिला मूरा आत्राम हिने द्वितीय, तर स्पेलिंग बीमध्ये नविना राजू कुरसामी हिने तृतीय क्रमांक मिळविला. इयत्ता सहावी ते आठवी गटात कविता सादरीकरणात तनुजा सुधाकर तोप्पा हिने प्रथम क्रमांक पटकावला.

या यशाबद्दल प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांसह त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक सुरेश गुट्टेवार, तुषार कापगते, विजया किरमिरवार, हिना गुट्टेवार, निर्मला सिडाम, रंजना सडमेक व मोनिका येजुलवार यांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्याध्यापक गिरीष कुलकर्णी, शरीफ शेख तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा तसेच भामरागड आदिवासी विकास प्रकल्पाच्या शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीला नवी झळाळी मिळाली आहे.

गडचिरोलीच्या शिक्षणाची राष्ट्रीय भरारी! शिवणीपाठ शाळेची यशोगाथा NIEPAच्या राष्ट्रीय पोर्टलवर

गडचिरोली : दुर्गम, नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याने शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रीय पटलावर नवी ओळख निर्माण केली आहे. शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत (२०२५-२६) महाराष्ट्रातील निवडक १०० शाळांच्या यशोगाथा, ९ शैक्षणिक मॉड्यूल्स आणि ३ शाळांच्या व्हिडिओ डॉक्युमेंटरी NIEPA (National Institute of Educational Planning and Administration) आणि NCSL (National Centre for School Leadership), नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय पोर्टलवर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या प्रतिष्ठेच्या यादीत अहेरी तालुक्यातील बोरी केंद्रांतर्गत येणाऱ्या जि. प. प्राथमिक शाळा, शिवणीपाठ या शाळेने स्थान मिळविले आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्तावृद्धीसाठी शिवणीपाठ शाळेने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. मुख्याध्यापक श्री. रविंद्र रत्नाकर यमसलवार यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली आणि सहकारी शिक्षिका श्रीमती सुरेखा मेश्राम यांच्या सहकार्याने शाळेत विविध शैक्षणिक प्रयोग राबविण्यात आले. कल्पकता, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर शाळेने केलेल्या या शैक्षणिक वाटचालीची दखल थेट नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्तरावरील संस्थांनी घेतली आहे.

महाराष्ट्रातील निवडक १०० यशस्वी शाळांमध्ये अहेरीसारख्या अतिदुर्गम भागातील शिवणीपाठ शाळेचा समावेश होणे ही गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध मर्यादित साधनसुविधांमध्येही गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येते, हे या यशोगाथेने अधोरेखित केले आहे. गडचिरोलीच्या जिद्दीला मिळालेली ही राष्ट्रीय पावती असून हे यश केवळ एका शाळेचे किंवा शिक्षकाचे नसून जिल्ह्यातील शिक्षकांच्या मेहनतीचे, समर्पणाचे आणि शिक्षणाप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे.

राष्ट्रीय स्तरावर गडचिरोलीचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल मुख्याध्यापक रविंद्र रत्नाकर यमसलवार आणि सहकारी शिक्षिका सुरेखा मेश्राम यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षकवर्ग तसेच स्थानिक नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. शिवणीपाठ शाळेच्या या उल्लेखनीय यशामुळे जिल्ह्यातील इतर शाळांनाही शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रभावी शालेय नेतृत्वासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.

गडचिरोलीत सांस्कृतिक गणेशोत्सवाचा जल्लोष; विविध कलाविष्कारांनी जिंकली रसिकांची मने

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गणेशोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम’ समाजकल्याण विभागाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ‘आपली कला, आपली संस्कृती, आपली ओळख आणि आपला अभिमान’ या भावनेतून आयोजित या कार्यक्रमात कला, संस्कृती, श्रद्धा आणि एकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय वातावरणात भावपूर्ण गणेश आरतीने करण्यात आली.

यानंतर स्थानिक कलाकारांनी विविध कलाविष्कार सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. प्रतीक भाईसारे याने ‘सूर निरागस’ या लोकप्रिय भक्तिगीतावर सादर केलेल्या सोलो नृत्याला उत्स्फूर्त दाद मिळाली. श्री गुरुदेव स्वरसाधना भजन मंडळ, गडचिरोली यांच्या भक्तिमय भजनांनी सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. चिमुकली साहित्या हिने ‘हे धरती हे अंबर तुझे गुण गाती’ या गीतावर सादर केलेल्या मनमोहक नृत्यानेही उपस्थितांची वाहवा मिळवली.

कार्यक्रमात सनराईज गरबा क्लास, गडचिरोली यांच्या चमूने सादर केलेल्या उत्साही गरबा नृत्याने विशेष रंगत भरली. युवा गायक कल्याणी आणि महेश यांनी सादर केलेल्या सुश्राव्य भक्तिगीतांनी वातावरण प्रसन्न केले. तसेच उपस्थित प्रेक्षकांसाठी आयोजित रंजक प्रश्नमंजुषा स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी, उपजिल्हाधिकारी स्मिता मोरे, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्यासह प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच गडचिरोली शहरातील नागरिक, महिला आणि युवा वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्थानिक कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपसंचालकांची धडक मोहीम; दुर्गम शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांशी साधला संवाद

गडचिरोली : शालेय शिक्षण विभागाच्या ‘चला शाळेला जाऊ या’ या विशेष उपक्रमांतर्गत नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी २२ व २३ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याचा दोन दिवसीय दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी दुर्गम भागातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची प्रगती तसेच पायाभूत सुविधांची पाहणी केली. मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर, आष्टी यासह परिसरातील शाळांना भेट देताना त्यांनी वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे वाचन, लेखन व गणितीय कौशल्य तपासले.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अहेरी तालुक्यातील इंदाराम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींची शैक्षणिक गुणवत्ता, निवास व भोजन व्यवस्था तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा आढावा घेत त्यांनी विद्यार्थिनींशी आपुलकीने संवाद साधला. शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांची उपस्थिती, डिजिटल शिक्षण आणि भौतिक सुविधांचीही त्यांनी बारकाईने पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यानंतर नागेपल्ली (आलापल्ली) येथील सेंट फ्रान्सीस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली भव्य शैक्षणिक आढावा सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रेरक उजागरे, DIET गडचिरोलीचे प्राचार्य चापले यांच्यासह अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली व मुलचेरा या पाच तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती तसेच विविध व्यवस्थापनांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेत पाचही तालुक्यांतील शैक्षणिक प्रगती, १०० टक्के पटनोंदणी, विद्यार्थ्यांची गळती रोखणे आणि शासनाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. “दुर्गम व आदिवासी भागातील प्रत्येक घटकापर्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवणे हेच आपले मुख्य ध्येय असून, संपूर्ण पर्यवेक्षीय यंत्रणा व मुख्याध्यापकांनी समन्वयाने आणि सक्रियतेने कार्य करावे,” असे आवाहन माधुरी सावरकर यांनी केले. त्यांच्या या दौऱ्यामुळे दक्षिण गडचिरोलीतील शैक्षणिक व्यवस्थेला अधिक गती मिळण्यासोबतच शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.